पान:Aagarakar.pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

५२


आगरकर : व्यक्ति आणि विचार

फारसा दोष नाहीं. इतिहास म्हणजे व्यक्तींनीं किंवा राष्ट्रांनी केलेल्या मोठ- मोठ्या पराक्रमांचे वर्णन आतां ज्या देशांतील व्यक्तींनीं किंवा व्यक्ति- समुदायांनी केव्हांही मोठमोठे पराक्रम केलेले नाहींत, ते इतिहास लिहिणार कशाविषयीं आणि वाचणार काय ? पौराणिक कालांत भारतीय आर्यानीं जे पराक्रम केले त्यांची गाथा भारत - रामायणरूपाने व्यासवाल्मीकांनी करून ठेविली आहे. अशाच प्रकारची ग्रीक आर्यांची गाथा होमर कवीनें रचिली आहे. पण या गाथ्यांत काव्य आणि इतिहास यांचें इतकें संमिश्रण झालें आहे कीं, यांना काव्य अथवा इतिहास यांपैकी कोणती संज्ञा द्यावी याचा संशय पडतो. शिवाय आमच्या पुराणांत धर्म व वेदांत यांचा प्रवेश होऊन यांचें एक विलक्षण पढम झालें आहे. तें तो पाहिजे त्या कामाला वापरतो. तथापि असल्या पुराणांचीं पारायणे करून अर्वाचीन विचारपद्धतीप्रमाणें त्यांपासून निघण्यासारखी असतील तितकीं सारी अनुमानें काढलीं आणि तीं एकवट केली तरी त्यांपासून आम्ही अगदी सुधारणाचलाच्या शिखरास पोंचलों होतों आणि त्यापुढे जाण्यास आम्हास अवकाश राहिला नव्हता, असें सिद्ध होण्याचा कांहीं संभव नाहीं. आमच्या आणि ग्रीक लोकांच्या पौराणिक स्थितीत विशेष अंतर नव्हतें असें आम्हांस आमच्या पुराणांची आणि होमरच्या काव्याची जी जुजबी माहिती आहे तीवरून वाटतें. पण पौराणिक काल उलटून गेल्यावर, ग्रीक लोकांनी सुधारणेचे कामांत जो झपाटा मारिला त्याच्या एक चतुर्थांश झपाटाही आमच्यानें मारवला नाहीं. जुन्या ग्रीक व रोमन लोकांच्या राज्यविषयक कल्पना अद्यापि आम्हांस आल्या नाहींत व आम्हांस कळू लागल्या नाहींत; तेव्हां तीन हजार वर्षों- पूर्वी त्या आमच्या स्वप्नांतही आल्या नसतील असें म्हणण्यास हरकत नाहीं. पण इतर गोष्टींत तरी आम्ही ग्रीक लोकांहून श्रेष्ठ किंवा त्यांच्या बरोबरीचे होत का ? आमच्या मतें स्वचित नाहीं. त्या काली ठाउक असलेल्या बहु- तेक कलांत व शास्त्रांत ग्रीक लोकच सर्वात श्रेष्ठ होते असा आमचा ग्रह झाला आहे. आणि तो साधारण बरोबर असेल तर जुन्याचें वृथा प्रस्थ माजविणाऱ्यांचा आम्हांस तिरस्कार येणें स्वाभाविक नाहीं काय ?
 पौराणिक कालांत आमची व ग्रीक लोकांची स्थिति सारखीच होती, असें म्हणण्यास हरकत नाही, वर्तमानपत्रांत अशा विषयांचा यथास्थितपणें