पान:Aagarakar.pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आगरकर : व्यक्ति आणि विचार

५०.

हें गोमांस रानटी लोकांप्रमाणें आम्ही हिरवें कच्चें खात नव्हतो ! तर सुधारलेल्या लोकांप्रमाणें त्यांत निरनिराळ्या तऱ्हेचे मसाले घालून त्याला नाना प्रकारच्या फोडण्या देऊन तें अत्यंत स्वादिष्ट करून खात होतों ! मत्स्याशनही आम्हांस ठाऊक नव्हतें असें नाहीं ! कोणत्या माशाची रसई कोणत्या रीतीनें करावी याबद्दल आम्हांपाशीं फार पुरातन नियम सांपडतात ! मांसभक्षणानंतर उत्तम मद्यप्राशन केल्यास फार मौज होते म्हणून सांगतात ! आमच्या पूर्वजांस ही मौजही ठाऊक नव्हती असें नाहीं ! सोमरस हा मादक पेय असो अथवा नसो; त्याशिवाय दुसरीं कसली तरी मादक पेयें येथें वहिवाटत होती अशाबद्दल जुन्या ग्रंथांत भरपूर आधार सांपडतो. याप्रमाणें आम्ही खाण्यापिण्याच्या कामांत अगदीं पुरातन काली सुद्धां पुरे पटाईत होऊन गेलों होतों. लिहिण्यापुसण्यांत व कुटुंबव्यवस्थेंत आणि ग्रामव्यवस्थेंतही आम्ही अगदीं अनभिज्ञ होतो असें नाहीं. लेखनकला आम्हांस केव्हां आली हैं जरी खात्रीने सांगता येत नाहीं तरी ती इतिहासकालापूर्वीच आम्हांस प्राप्त झाली होती असें म्हणण्यास हरकत नाहीं. लेखनकला अभ्युदयास आणून नीति, न्याय, नाटक, अलं- कार, व्याकरण, गणित व वैद्यक इत्यादि शास्त्रांतही आमची बरीच गति झाली होती. आम्हांमध्ये उत्तम प्रकारची कुटुंबव्यवस्था व ग्रामव्यवस्था स्थापण्यांत आली असून राष्ट्र म्हणजे काय हें आम्हांस कळू लागलें होतें. आमच्यांत स्वतंत्र व मांडलिक राजे असून त्यांच्या पदरीं चतुरंग सेना असत. मोठमोठं दुर्ग बांधण्याची कला त्यांस अवगत होती. साम, दाम, दंड, भेद इत्यादि शत्रुस वळणीस आणण्याची साधनें ते वारंवार उपयोगांत आणीत असत. यावरून काय दिसतें कीं, अलीकडल्या इंग्रज लोकांनी किंवा युरोपांतील दुसऱ्या कोणत्याही लोकांनी कितीही शेखी मिरवली तरी ज्या आम्ही इतक्या पुरातन कालीं येवढी मोठी सुधारणा करून बसलों त्या आमच्यापुढे त्यांची मात्रा बिलकुल चालावयाची नाहीं !
न चाल बिचारी ! पण या एककल्ली देशाभिमान्यांना आम्ही असें विचारितों कीं, बाबांनों, तुम्ही अशा प्रकारें गतवैभवाचें गाणें गाऊं लागलां म्हणजे तुमच्या पक्षाचें मंडन न होतां उलट मुंडण होतें ! इंग्रज लोक रानटी होते, त्या वेळेस जर तुम्ही इतके सुधारलेले होतां, तर आतांही