पान:Aagarakar.pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

४७

सुधारक काढण्याचा हेतु

यांहून अन्य प्रकारचें भाषण ज्यांस फारसें माहीत नाहीं; अनेक देशांतील उद्योगी पुरुषांनी अहर्निश परिश्रम करून, पदार्थधर्माचे केवढे ज्ञान संपादिले आहे, विपद्विनाशक व सुखवर्धक किती साधने शोधून काढिलीं आहेत, व राज्य, धर्म, नीति वगैरे विषयातील विचार किती प्रगल्भ झाले आहेत हे ज्यांना ऐकून सुद्धां ठाऊक नाहीं, अशा गृहस्थांनी आम्ही हिंदु लोक नेहमीं पर- तंत्रच असलों पाहिजे; कांहीं केलें तरी अधिक राज्याधिकार उपभोगण्याची पात्रता आमच्या अंगी यावयाची नाहीं ; राष्ट्रीय स्वातंत्र्याचा विचार आम्ही कधीं स्वप्नांतसुद्धां आणूं नये; स्थानिक स्वराज्य, राष्ट्रीय परिषद, कायदे- कौन्सिलांत लोकनियुक्त सभासद, स्वसंतोषाने शिपाईगिरी करण्याची इच्छा धरणें- - या व या तऱ्हेच्या दुसऱ्या उठाठेवींत आम्हीं पडणें हें शुद्ध मूर्खपण होय, असें म्हणावें यांत नवल नाहीं. अशा प्रकारचें प्रतिपादन कर- णाऱ्या लोकांस लोकाग्रणी न म्हणतां, लोकशत्रु म्हटलें असतां वावगे होणार नाहीं. तसेंच जेवढीं जुनीं शास्त्रे तेवढीं सारी ईश्वरप्रणीत, त्यांना हात लावणें हैं. घोर पातक, अशी ज्यांची समजूत; जगत्कारणाच्या तोंडांतून, हातांतून, मांडींतून व पायांतून एकेक वर्ण निघाला अशी ज्यांची वर्णोत्पत्तीविषय कल्पना; पंचामृतानें व धूपदीपानें केलेली पूजा मात्र ईश्वरास मान्य, याहून ईशपूजेचा विशेष प्रशस्त मार्ग नाहीं, असे ज्यांचे धर्मविचार; आहे ही सामाजिक स्थिति अत्युत्तम, हात फिरवाफिरव करण्यास कोठेंही अवकाश नाहीं; सध्यां येथें स्त्रियांचे पुरुषांशीं, मुलांचे आईबापांशीं, जे संबंध चालत आहेत तेच उत्तम आहेत व अनंतकाल तेच चालले पाहिजेत: ज्ञान संपादणें हें पुरुषांचे कर्तव्य, शिशुसंगोपन हैं स्त्रियांचे कर्तव्य; पुरुष स्वामी, स्त्री दासी: स्वातंत्र्य पुरुषांकडे, पारतंत्र्य स्त्रियांकडे; विवाहाशिवाय स्त्रीस गति नाहीं, व गृहाशिवाय तिला विश्व नाहीं; वैधव्य हे तिचे महाव्रत व ज्ञानसंपादन हा तिचा मोठा दुर्गुण; अशा प्रकारच्या ज्यांच्या धर्मविषयक व समाज- विषयक कल्पना, असे लोकाग्रणी काय कामाचे ? अशांच्या उपदेशानें व उदाहरणानें आम्हांस चांगलें वळण कसें लागणार व इतर सुधारलेल्या राष्ट्रांस होत असणाऱ्या सुखाचा लाभ आम्हांस कशाने होणार ? निदान सुधारकास तरी असले लोकाग्रणी व त्यांचे वर्तन मान्य नाहीं... ज्या तत्त्वाचें अवलंबन केल्यामुळे इतर स अधिकाधिक सुधारत चालली आहेत, त्या