पान:Aagarakar.pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

४३

सुधारक काढण्याचा हेतु

योगनिद्रेत प्राण धरून राहिलेल्या योग्याच्या जगण्यासारखे होय. हिंदु- स्थानच्या अस्तित्वाशीं तोलून पाहतां जुन्या ग्रीक व रोमन लोकांचें अस्तित्व कांहींच नाहीं असें म्हणतां येईल. पण तेवढ्या स्वल्प काळांत त्यांनी केवढाले पराक्रम केले व केवढी अमर कीर्ति संपादिली ! भाषापरिज्ञानप्रवीणांनी अलीकडे असा सिद्धांत केला आहे कीं, हिंदु लोक, ग्रीक लोक व रोमन लोक, जर्मन शाखेपासून निघालेले अर्वाचीन युरोपांतील इंग्लिश, डच वगैरे लोक एकाच पूर्वजापासून झालेले असावे. या सर्वांस ते आर्यकुलोद्भव राष्ट्र म्हण- तात. हें खरें असेल तर काय सिद्ध होतें कीं, एकाच झाडाचें बीं चार | प्रकारच्या जमिनींत पडून त्यापासून चार प्रकारच्या वृक्षांचा उद्भव व्हावा, व प्रत्येकाला निराळ्या तऱ्हेची वाढ लागून त्यांचा शेवटही निराळ्या तऱ्हेचा व्हावा, त्याप्रमाणें एकाच आर्य कुलापासून उत्पन्न झालेले आम्ही सर्व खरे, पण स्थानांतराप्रमाणे आम्हा सर्वोचा इतिहास निराळ्या प्रकारचा झाला ! आर्य लोकांची युरोपांत जी शाखा गेली, तीपासून ग्रीस देशांत एक उत्तम राष्ट्र उद्भवलें. त्याचीच एक मुळी इताली देशांत जाऊन तीपासून जो नवीन अंकुर उत्पन्न झाला, त्यानें मातृवृक्षास नाहींसें करून आपला विस्तार बराच दूरवर नेला. पुढे त्यालाहि वार्धक्यावस्था येऊन, त्याचा -हास होण्याच्या सुमारास त्यापासून बरीच नवीन रोपें अस्तित्वात आली. तीं ह्रीँ अर्वाचीन युरोपांतील राष्ट्र होत.
 इकडे हिंदुस्थानांत आर्यलोकांची जी शाखा आली, तिचा निराळ्याच तऱ्हेचा इतिहास झाला. तिकडे जुन्या वृक्षानें नव्या अंकुरांत आपले गुण ठेवून आपण नाहींसें व्हावें, पुनः त्या नवीन अंकुरानें तसेंच करावें व प्रत्येक नवीन राष्ट्रोद्भव पहिल्यापेक्षां बहुतेक गुगांत वरिष्ठ व्हावा, असा प्रकार झाला. इकडे अशा प्रकारची राष्ट्रोद्भवपरंपरा अस्तित्वांत आली नाहीं. मूळ आर्यशाखा येथें येऊन तिच्यापासून जे झाड येथे लागलें तेंच आजमितीपर्यंत अस्ति- त्वांत आहे, असें म्हणण्यास हरकत नाहीं. ग्रीक, रोमन, सिथियन, तार्तर, मोगल, अफगाण वगैरे लोकांच्या ज्या वावटळी त्यावर आल्या, त्यामुळे त्याला बराच त्रास झाला. कधीं त्याच्या कांहीं फांद्या मोडून पडल्या; कधीं तें मुळापासून उपटून पडत आहे कीं काय असें वाटलें; पण कर्मधर्मसंयोगानें युरोपातील ग्रीक व रोमन शाखांवर आणि इकडील इराणी शाखेवर जो