पान:Aagarakar.pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गोपाळ गणेश आगरकर प्रामाण्यापेक्षां ते विचारवंताच्या बुद्धिप्रामाण्यालाच अधिक महत्त्व देतात. उलट, गांधीजीं बुद्धिप्रामाण्याकडे अनेकदां साशंकतेनें पाहत असलेले दिसतात. बुद्धिवाद आणि श्रद्धावाद असें या भेदाचें स्थूल वर्णन होऊ शकलें तरी तें फार अपुरें आणि असमाधानकारक वाटतें. गांधीजींच्या तत्त्वज्ञानाची परिणति न कळत निवृत्तिमार्गाच्या पुरस्कारांत होते. सामाजिक जीवनांत संन्यस्त वृत्तीला असें भलतें महत्त्व द्यायला आगरकर कधींच तयार झाले नसते. भोग भोगल्यानें मनुष्याची तृप्ति होत नाहीं, म्हणून त्याच्यापुढे सर्वांगीण संयमाचें ध्येय सदैव ठेवलें पाहिजे असें गांधीजींना वाटतें. सर्व समाज सुखी व्हावा म्हणून व्यक्तीला जो संयम पाळावा लागेल किंवा जो त्याग करावा लागेल तेवढाच आगरकरांना मान्य होता. संयमाकरतां संयम हें तत्त्व त्यांना कधींच संमत झालें नसतें. प्रवृत्ति हा मानवी जीवनाचा आत्मा आहे, सुखोपभोग हा प्रत्येक मनुष्याचा हक्क आहे या हक्कावर आवश्यक तेवढेच सामाजिक नियंत्रण असावें, असें त्यांनीं पुनःपुन्हां प्रतिपादन कलें आहे. नवें जग हवें तर त्याकरता नवा मनुष्य निर्माण व्हायला हवा. आजचा सर्वसामान्य मनुष्य अधिक अंतर्मुख, अधिक तत्त्वनिष्ठ आणि अधिक-त्यागप्रवृत्त झाल्याशिवाय नवें जग निर्माण होऊं शकणार नाहीं,या श्रद्धेवर गांधीजींनी आपल्या सर्व तत्त्वज्ञानाची उभारणी केली आहे. पण सामान्य मनुष्याविषयीं आगरकरांना त्यांच्याइतकाच जिव्हाळा वाटत असला तरी त्याच्या विकासाला आणि कर्तृत्वाला अनेक नैसर्गिक व स्वाभाविक मर्यादा आहेत हें ते सहसा विसरत नाहींत. सामाजिक क्रांतीची त्यांची तळमळ गांधीजींच्या इतकीच उत्कट आहे. पण ही क्रांती सर्वसामान्य मनुष्यस्वभाव बदलून घडवून आणतां येईल असें त्यांना स्वप्रांतसुद्धां खरें वाटलें नसतें. क्रांति नेहमींच असामान्य व्यक्तींच्या बुद्धींतून, त्यागांतून आणि कर्तृत्वांतून जन्म पावते. सामान्य माणसें या कामाला अपुरीं पडतात. त्यांच्याविषयी आगरकरांनी एके ठिकाणीं अत्यंत मार्मिक उद्गार काढले आहेत. ते म्हणतात,'भाविक व अभाविक, सुधारक व दुर्धारक, धर्मनिष्ठ व पाखंड, यांपैकीं नऊशें नव्याण्णव लोक ईझिगोइंग म्हणजे खुशालचेंडू