पान:Aagarakar.pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

. ३५ गोपाळ गणेश आगरकर लागेल तेवढा कर देऊन बाकीच्यांत येथील बहुतेक प्रजेनें हवा तसा आपला गुजारा करावा!' X X X ११ देशाच्या राजकीय आणि आर्थिक गुलामगिरीविषयीं आगरकरांनी असले तिखट उद्गार वारंवार काढले आहेत. पारतंत्र्याची इतकी चीड असणाऱ्या लेखकाची देशभक्त म्हणून पूजा व्हायचा तो काळ होता. पण आगरकराच्या वाट्याला मात्र गेंदेदार गुलाबांऐवजीं अणकुचीदार दगडधोंडे आले. देशाचे रक्तशोषण करणाऱ्या परकीय राज्ययंत्रावर तुटून पडणाऱ्या इतर नेत्यांच्या मिरवणुकी निघत असतांना आगरकरांना फक्त आपली प्रेतयात्राच पहायला मिळाली. ज्या रूढिग्रस्त समाजाचे डोळे उघडावेत म्हणून त्यांनीं हंसतमुखानें आपल्या आयुष्याचा होम केला, त्याच समाजानें त्यांना आमरण शत्रुवत लेखले. त्यांच्या त्यागाविषयीं,विद्वत्तेविषयीं आणि चारित्र्याविषयीं समाज नि:शंक होता. आगरकर देवमाणूस आहेत हें त्यालाही नाकबूल करता येत नव्हतें. त्यांचा गुन्हा फक्त एकच होता--तो म्हणजे ते देव न मानणारे देवमाणूस होते! आगरकरांच्या काळच्या सुशिक्षितापैकीं ज्यांना देवाधर्माच्या परंपरागत वेडगळ कल्पना पटणें शक्य नव्हतें, त्यांनी आपल्या मनाचें समाधान करण्याकरता आर्यसमाज, ब्रह्मोसमाज,प्रार्थनासमाज वगैरे अधिक समंजस अशा पंथाचा आश्रय केला. या सर्व पंथांनी हिंदुधर्मातल्या अनेक भोळ्या आणि खुळया धार्मिक समजुतींचा त्याग करण्याचे धैर्य दाखविलें होतें हें खरें! पण त्या सर्वांना ईश्वराचे अस्तित्व मान्य होतें. देवाच्या अस्तित्वाविषयीं साशंक असलेल्या गौतम बुद्धालाच देव करून सोडणाऱ्या हिंदुसमाजाची मर्माची जागा त्यांनीं ओळखली होती. तिथं घाव घालून त्याला चिडविण्याचें धाडस या पंथांच्या संस्थापकांत किंवा अनुयायात नव्हतें. आगरकरांनीं मात्र अज्ञेयवादाचा पुरस्कार करून तें साहस केले. आगरकरांच्या जीवनविषयक तत्त्वज्ञानांत देवाला थारा नाहीं, दैवाला जागा नाहीं, परलोक आणि पुनर्जन्म यांना अद्भुतरम्य कविकल्पनांपली