पान:Aagarakar.pdf/45

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३३ गोपाळ गणेश आगरकर आठवड्यांतून दोन पैसे मागें टाकतां येऊं नयेत, वर्षांतून महिनाभर हक्काची रजा मिळू नये, एक दिवस विश्रांति मिळू नये, वीस पंचवीस वर्षें इमानें इतबारें नोकरी केल्यावर लहानशा पेन्शनची आशा असू नये व हातपाय लुला झाला असतां कसलाही आधार असूं नये ही किती कष्टावह व किती निर्दयपणाची सेवा आहे बरें!......... असली नोकरी करणारांचीं शरीरें ओतीव लोखंडाची केली असलीं तरी तीं सुद्धां चारसहा महिन्यांत झिजून जाऊन मोडकळीस येतील असें वाटतें. मग हाडामांसाच्या माणसांची कथा काय? पण या गोष्टीकडे आमच्या कांडर साहेबांचे कधीं लक्ष गेलें आहे काय? कशाला जाईल? हवे तितके नेटिव लोक पैदा होत आहेत तोंपर्यंत ते या हृदयभेदक स्थितीकडे कशाला पाहतील ?' अर्धपोटीं राहणाऱ्या श्रमिकांची आर्थिक दु:स्थिति सुधारण्याची त्यांना जेवढी आवश्यकता वाटते, तेवढीच वाङ्मयांतही आपल्या समाजाची अकुंठित प्रगति व्हावी अशी उत्कट इच्छा त्यांच्या मनांत वास करीत आहे. विकारविलसिताच्या प्रस्तावनेंत ते लिहितात,'रोमिओ, लीअर, ऑथेल्लो,सीझर आणि हॅम्लेट हे नायक एकाच कवीनें निर्माण केले असावेत किंवा ज्यूलिएट, रीगन, कार्डीलिया,डेस्डेमोना आणि ऑफिलेिया या तरुणांगना एकाच कल्पनेंतून निघाल्या असाव्यात ही परम आश्चर्याची गोष्ट नाहीं का? आमच्या इकडील कवि दशरसांच्या पाशांत अगदीं जखडूनं गेल्यामुळे स्वभाववैचित्र्यवर्णन हा गुण त्यांच्यांत दुर्मिळ झाला आहे असे म्हणावयास हरकत नाही. चारुदत्त व वसंतसेना, दुष्यंत व शकुंतला, राम व सीता, माधव व मालती या नायक-नायिकांच्या युगुलांत म्हणण्यासारखें प्रकृतिवैचित्र्य काय आहे?' कविकल्पनांच्या उंच उड्डाणांकडे इतक्या बारकाईनें पाहणारी त्यांची दृष्टि खालीं मैदानांकडे वळती तरी तिथेही आपल्यांत काय कमी आहे आणि तें वैगुण्य कसें भरून काढलें पाहिजे हें चटकन् तिला दिसून येतें. 'सणांचा व खेळांचा ऱ्हास'या लेखांत आगरकर म्हणतात,'कोणत्याही देशांतील लोकांत नाना प्रकारचे व्यायामशील खेळ खेळण्याची हौस असणे व तसले खेळ खेळणाऱ्या लोकांची मोठी संख्या त्यांत दृष्टीस पडणे हें त्या देशाच्या सुस्थितीचे मोठे व्यंजक आहे.........सध्यां जो तो 'अभ्यास ’-‘अभ्यास’ ३ अा. अ