पान:Aagarakar.pdf/43

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३१ गोपाळ गणेश आगरकर पुरुषांच्या बरोबरीनें शिक्षण दिलें पाहिजे, एक सामाजिक घटक या नात्यानेंच समाजानें स्त्रीच्या हक्कांचा आणि कर्तव्यांचा विचार केला पाहिजे, विवाहाच्या बाबतीत पुरुषांपेक्षा तिचे स्वातंत्र्य रतिमात्रही कमी असतां कामा नये,या गोष्टी तर त्यांनीं प्रतिपादन केल्याच! पण मुलांमागून मुलें होऊं लागल्यामुळे स्त्री न कळत सर्वस्वीं संसारांत गुरफटली जाऊं लागते आणि यौवनांत पदार्पण करतांना तिच्या मनांत उद्भवलेले आकांक्षाचे अंकुर जागच्या जागीं जळून जातात हें लक्षांत घेऊन त्यांनी मांडलेले विचार आजच्या काळांतही अनेकांना अस्वस्थ करून सोडतील. आगरकर म्हणतात,'सध्यां स्त्रियांना जीं इतकीं मुलें होतात ती त्यांच्या संतोषानें होतात असें आम्हांस वाटत नाहीं. या संबंधानें पुरुषांकडून स्त्रियांवर जुलूम होतो असा आमचा समज आहे, बाळंतपणाच्या क्लेशाची यत्किचिंत् झळ पुरुषांच्या प्रत्ययास येण्यासारखी असती तर त्यांनीं आपल्या मनोविकारांना इतकें सैल सोडलें नसतें. 'परदु:ख शीतळ'या तत्त्वावर सध्यां त्यांचे वर्तन चाललें आहे. स्त्रियांप्रमाणेंच त्यांनाहि कधीं कधीं प्रसूतिवैराग्य येण्याचा प्रसंग असता, तर उभयतांच्या संमतीनें बराच भूभार कमी होता. तथापि हा सांप्रतचा अन्याय फार दिवस चालेल असें दिसत नाहीं. जसजसा पुरुषांत विद्येचा अधिकाधिक प्रसार होईल तसतसा स्त्रियांतहिं त्याचा उपक्रम होऊन तो वाढत जाणार. तो वाढत गेला म्हणजे स्त्रियांना आपलें खरें हित कशांत आहे आणि तें साधावें कसें हें समजूं लागणार, आणि तें समजूं लागलें कीं पुरुषांना हा आपला सांप्रतचा जुलूम सोडून द्यावा लागणार.विवाहाच्या कामीं स्त्री-पुरुषांची संमति जितकी अवश्य आहे तितकीच संमति विवाहाच्या अंमलातहि दृष्टीस पडूं लागली पाहिजे.तसें होऊं लागेल तेव्हांच स्त्रियांची पुष्कळ विपत्ति टळेल.' स्त्री आणि पुरुष यांच्या चारित्र्याकडे पाहतांना समाज जीं भिन्न नीतिमूल्ये वापरतो त्यांचाही त्यांनी एके ठिकाणीं असाच अत्यंत स्पष्ट रीतीनें निषेध केला आहे. ते म्हणतात,'स्त्रीच्या अनीतीपासून उत्पन्न होणारे अवांतर दुष्परिणाम कितीहि वाईट असले तरी ही गोष्ट निर्विवाद आहे की स्त्रीच्या अनीतीबरोबर पुरुषालाही अनीतिमान व्हावें लागतें. पुरुष आपली नीति भ्रष्ट होऊं देणार नाहीत तर स्त्रियांच्या हातून अनीति घडणें