पान:Aagarakar.pdf/42

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आगरकर : व्यक्ति आणि विचार ३०

दृढ श्रद्धेंत आहे. आगरकरांनीं आयुष्यभर तर्कशुद्ध पद्धतीनें याच विचारसरणीचा पुरस्कार केला.

'आधीं घरची गुलामगिरी नाहींशी झाली पाहिजे'असें प्रतिपादन करणाऱ्या आगरकरांनीं निकटवर्ती मध्यम वर्गाच्या संसाराकडे जेव्हां दृष्टि वळविली, ज्या गृहिणीमुळें घराला नंदनवनाचे स्वरूप येतें तिचे अंतरंग जेव्हां त्यांनी न्याहाळून पाहिलें, तेव्हां भवभूतीनें ‘करुणस्य मूर्ति:’ म्हणून उल्लेखिलेली अभागिनी सीताच या नाहीं त्या रूपानें पिढयान् पिढ्या हिंदुसमाजांत घरोघर वावरत आली आहे अशी त्यांची खात्री होऊन चुकली. तिच्यावर होणारा जुलूम केवळ अमानुष होता! भातुकली खेळण्याच्या वयांत तिच्यावर अक्षता टाकल्या जात होत्या, अल्लडपणानें खेळण्याच्या वयांत तिला मातृपदाचा भार वाहावा लागत होता, वैधव्य येतांच धर्माच्या नांवाखालीं तिचे विद्रूप विडंबन केले जात होतें, मुलांना जन्म देणें व त्यांच्या खस्ता काढणें यांच्या पलीकडे तिच्या आयुष्याला दुसरें कुठलेंहि ध्येय उरलें नव्हतें, आणि पति व्यसनी असला, निर्दय असला, अगदीं पशु असला, तरी दरवर्षी वटपौर्णिमेला आणि हरताळकेला 'देवा, जन्मोजन्मीं हाच पति मला दे'अशी परमेश्वराकडे तिला प्रार्थना करावी लागत होती. स्वातंत्र्य हा शब्दच तिला अपरिचित होता! स्त्री ही निसर्गतः पुरुषाची प्रभावी जीवनस्फूर्ति असायची! पण हिंदु रूढीनें तिला अगतिक कारुण्यमूर्ति करून ठेवलें होतें !

सामाजिक गुलामगिरीची मूर्तिमंत प्रतिमा असलेल्या मध्यम वर्गातल्या स्त्रीला बंधमुक्त करण्याकरितां आगरकरांनी केलेलें लिखाण वाचतांना डोळ्यांसमोर जें चित्र उभे राहतें तें खोलींत बसून शांतपणे लिहिणाऱ्या पांढरपेशा विद्वानाचें नव्हे, तर धर्मयुद्धाच्या भावनेनें प्रेरित झाल्यामुळें रणांगणावर ज्याची तरवार सारखी तळपत आहे अशा योद्धयाचें! स्त्रीस्वातंत्र्याचा तर्कशुद्ध रीतीनें पुरस्कार करतांना आगरकर कुठल्याही नाजुक प्रश्नापाशीं थबकले नाहींत किंवा कुठलीही समस्या अर्धवट सोडून सुवर्णमध्याचे मृगजळ शोधण्याचा त्यांनी कधीं प्रयत्न केला नाहीं. स्त्रियांना