पान:Aagarakar.pdf/40

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आगरकर : व्यक्ति आणि विचार २८

न व्हावा म्हणून त्यांच्या मार्गांत कोट्यवधि लोकांचा मूर्खपणा, वृथा धर्माभिमान आणि उठावणीचे आरडे यांचे अडथळे आणून घातलेत तरी ज्याप्रमाणे पर्वतांच्या माथ्यावरील सरोवराच्या भिंती फोडून तुफान वेगानें कड्यावरून पडू लागलेल्या वारिवाहाची गति कुंठित करण्यास कोणींही धजत नाहीं, त्याप्रमाणे आमच्या मूर्खपणाच्या सामाजिक व धार्मिक समजुतींस लागलेला वणवा कोट्यवधि अजागळ कीटकांच्या क्षुद्र पक्षवातानें किंवा मोठया किड्यांच्या शुष्क श्वासवातानें विझण्याचा मुळींच संभव नाहीं. उलट हेच त्यांत होरपळले जाण्याचा संभव आहे.' ८ आगरकरांनीं पुरस्कारिलेल्या या बुद्विवादी तत्त्वज्ञानामुळे ज्यांची अंधश्रद्धा डिंवचली जात होती, ज्यांच्या मानीव मोठेपणाला धक्का पोंचत होता, किंवा ज्यांच्या स्वार्थाचा पाया समूळ उखडला जाण्याचा संभव होता, ते सारे वर्ग त्यांच्या विरोधकांत सामील झाले यांत नवल नव्हतें. आश्वर्याची गोष्ट ही की ज्यांचीं सर्वसामान्य मतें आगरकरांच्या विचारांहून फारशीं भिन्न नव्हतीं, अशा सुबुद्ध सुशिक्षितांच्या एका मोठया वर्गानें या विरोधकांचे पुढारीपण पत्करलें. आधी आपल्या पायांतल्या राजकीय श्रृंखला तोडूं या, सामाजिक शृंखलांचा पुढे सावकाश विचार करता येईल, असा या विरोधकांचा मुख्य सूर होता. आगरकरांना तो मान्य होणें शक्य नव्हतें. राजकीय पारतंत्र्याची त्यांनाहि मनस्वी चीड येत होती. इंग्लिश राज्यांत पोटभर अन्न मिळत नाहीं, हें भीषण दृश्य त्यांनाहि पदोपदीं दिसत होतें. पण सामाजिक गुलामगिरीची उपेक्षा करून राजकीय गुलामगिरी नाहींशी होईल या गोष्टीवर त्यांचा काडीचाहि विश्वास नव्हता. एखादा किल्ला लढवितांना सेनापतीनें तटबंदी आणि तोफखाना यांची जितकी काळजी घेतली पाहिजे तितकीच किल्लयांत भरपूर अन्नसामग्री आहे कीं नाहीं, आणि त्यांतल्या विहिरींचें पाणी दूषित झालें आहे किंवा काय याविषयीही त्यानें चिंता वाहिली पाहिजे असें त्यांना वाटे. ते म्हणतात,'आठदहा वर्षांच्या पोरीस साठसत्तर वर्षांच्या थेरड्याच्या कबजांत देणाऱ्या किंवा जिला बारावें वर्ष देखील लागलेलें नाहीं अशा मुलीच्या आपत्तीचा विचार न करतां तिच्याशीं