पान:Aagarakar.pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 आगरकर:व्यक्ति आणि विचार २६ शक्तींची असत्यता प्रत्ययास येते, पूजेस व प्रार्थनेस ओहोटी लागते, आणि कांहीं वेळ सर्व ब्रम्हांडास उत्पन्न करून त्याचें पालन व नाश करणाऱ्या अशा एका परमात्म्याच्या कल्पनेचा उदय होतो. पण पुढे वेदांत विचारांच्या कुंडांत पेटलेल्या अग्नींत हें द्वैतहि खाक होऊन जातें आणि ‘अहं ब्रम्हास्मि'एवढा अनिर्वचनीय विचार मागें रहातो. व्यक्तींच्या वा राष्ट्रांच्या धर्मविचारांचा हा कळस आहे. येथपर्यंत ज्याची मजल आली त्याला सर्व धर्म तुच्छ आहेत.' ७ मानवतेच्या विकासाच्या इतिहासांत धर्मांचें स्थान उपेक्षणीय नाहीं आगरकरांना मान्य आहे. पण धर्म ही सुद्धां एक सामाजिक संस्था आहे,काळाबरोबर तिचे स्वरूप बदललें नाहीं तर ती प्रगतीला प्रेरक न होतां उलट मारक होते हें ते कटाक्षानें प्रतिपादन करतात. अन्यायी राजापेक्षां त्याचे जुलमी अधिकारीच जसे प्रजेला अधिक संत्रस्त करून सोडतात, त्याप्रमाणे चुकीच्या धर्मकल्पनांपेक्षांहि रूढींच्या रूपानें होणारी त्यांची अम्मलबजावणी मानवतेच्या दु:खाला अधिक कारणीभूत होते हें ओळखून त्यांनी हिंदु समाजांत सर्रास प्रचलित असलेल्या अनेक हास्यास्पद आणि अमानुष रूढींवर पुन:पुन्हां हल्ले चढविले आहेत. शेंकडों वर्षाच्या वचनांचा आणि हजारों वर्षांच्या परंपरांचा आधार असल्यामुळे या राक्षसी रूढी प्रबळ होऊन बसलेल्या असतात. शंकराच्या वरदानानें उन्मत्त झालेल्या भस्मासुराप्रमाणे धर्माच्या आधारावर त्यांचा नंगानाच समाजांत सुरू राहतो. सामान्य व्यक्तीच्या अंगीं त्यांच्या विरुद्ध बंड पुकारण्याचे धैर्य सहसा नसतें. प्राचीन काळच्या मोठमोठया ऋषींपेक्षां कांहीं आपण शहाणे नाहीं अशी समजूत करून घेऊन हीं सारीं दुबळीं माणसें आपणांवर होणारे अन्याय मुकाट्यानें सोशीत राहतात. सामान्य मनुष्याचा हा मानसिक दुबळेपणा आधीं नाहींसा झाला पाहिजे या जाणीवेनें आगरकर म्हणतात,'कोणतेही आचार घालण्यास पूर्वीच्या ऋषींस जितका अधिकार होता तितकाच आम्हांसही आहे. पूर्वकालीन आचार्यांवर ईश्वराची जितकी कृपा होती तितकीच आम्हांवरही आहे. बऱ्यावाइटाची निवडानिवड करण्याची बुद्धि त्यांना होती तितकी