पान:Aagarakar.pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आगरकर : व्यक्ति आणि विचार २२

'पण लक्षांत कोण घेतो'या कादंबरीतच झाला.'सुधारक'१८८८ त निघाला आणि हरिभाऊंनी या कादंबरीचे लेखन १८८९ त सुरू केले. पुढे दोन पिढया मराठी ललित वाङ्मयातल्या सर्व प्रतिभावान लेखकांनीं सामाजिक सुधारणेचा कैवार घेतला ही कांहीं योगायोगाची गोष्ट नाहीं. आगरकरांच्या भावनायुक्त निबंधांचे संस्कारच या परिवर्तनाच्या मुळाशीं होते. १९२० पर्यंत वाङ्मयीन टीका आणि राजकीय निबंध या दोन क्षेत्रांवर निबंधमालेची जशी छाया होती त्याप्रमाणे काव्य,कथा,विनोद,नाट्य या क्षेत्रांवर आगरकर वर्चस्व गाजवीत होते. ही शक्ति वाङ्मय-विलासाची नव्हती.ती क्रांतिकारक विचारांची होती. आगरकरांच्या सामाजिक निबंधांची परंपरा जरी पुढे चालली नाही,तरी त्यांचें वाङ्मय ही सुगंधानें दरवळणारी फुलबाग नसून तें अग्निज्वाळांनीं रसरसलेलें यज्ञकुंड आहे, ही जाणीव महाराष्ट्रांतला सुबुद्ध समाज कधींच विसरला नाहीं.

६ आज अर्धशतकाचा अवधि लोटल्यानंतर आगरकरांचे निबंध वाचणारा मनुष्य त्यांच्या वाङ्मयाला क्रांतिकारक हें विशेषण लावायला फारसा तयार होणार नाहीं. त्यांनीं ज्या सामाजिक क्रांतीकरतां जिवाचें रान केलें तिचें बाह्यस्वरूप आपल्या अंगवळणीं पडल्याला एक पिढी होऊन गेली आहे. मानवी जीवन गतिमय असल्यामुळे कालचा क्रांतिकारक हा आजचा सुधारक ठरतो व आजचा सुधारक हा उद्यांचा सनातनी होण्याचा संभव असतो! हें लक्षांत घेऊन ऐतिहासिक दृष्टीनें आगरकरांच्या वाङ्मयाकडे आपण पाहूं लागलों तर असामान्य ओज, अलौकिक तळमळ, भविष्यकाळांत डोकावून पाहण्याची शक्ति, आणि विचारप्रवर्तनाचें विलक्षण सामर्थ्य हीं क्रांतिकारक वाङ्मयाचीं प्रमुख लक्षणें त्यांच्या लेखनांत स्पष्टपणे प्रचीत होतात. दारिद्र्य मनुष्याला अकालीं प्रौढ करतें. आगरकर तरी या नियमाला कुठून अपवाद होणार? आपल्या विद्यासंपादनाच्या उत्कट इच्छेला पदोपदी येणारे अडथळे पाहून अगदी लहानपणीच त्यांना सामाजिक विषमतेची तीव्रतेनें जाणीव झाली असावी, स्वभावतःच सहृदय असलेल्या या दरिद्री पण बुद्धिमान् तरुणानें शिकतां शिकतां भोवतालच्या हरतऱ्हेच्या