पान:Aagarakar.pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आगरकर व्यक्ति आणि विचार १६

ते आदर्शच वाटतात. त्यांचे हे सर्व वैयक्तिक गुण त्यांच्या लेखनांत आणि शिकवणींत उत्कटत्वानें प्रतिबिंबित झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या निबंधांत विशाल दृष्टि, सत्यप्रीति, जिव्हाळा, आवेश आणि तळमळ यांचा अपूर्व संगम झालेला आढळतो. मराठी भाषेला भूषणभूत झालेल्या निबंधकारांत त्यांचे स्थान अत्यंत उच्च आहे. पण, साहित्यकार म्हणून त्यांनी मिळविलेलें पहिल्या प्रतीचे यश हें कांहीं कलेचे यश नाहीं; तें विचारशक्तीचे यश आहे. तें समाजाविषयीं त्यांना वाटणाऱ्या अलौकिक आपुलकीचे यश आहे. आपल्या भोवतालचे जग सुखी व्हावेंं म्हणून प्रामाणिकपणानें तळमळणाऱ्या एका महान् आत्म्याचें तें यश आहे. निबंधाचे तंत्र काय असतें, किंवा काय असावें याचा आगरकरांनीं फारसा अभ्यास किंवा विचार केला नसावा पण सर्व प्रकारच्या गुलामगिरीत खितपत पडलेल्या स्वत:च्या समाजाच्या अधोगतीच्या कारणांचा मात्र त्यांनीं कसून अगदीं मूलगामी पद्धतीनें वर्षानुवर्षे विचार केला. या विलक्षण विचारप्रक्षोभांतच त्यांच्या हृदयंगम निबंधलेखनाचा उगम आहे.

आगरकरांनीं लोकजागृतीच्या एकमेव हेतूनें आपलें सारें निबंधलेखन केलें असलें तरी अनेक स्वाभाविक वाङ्मयगुणांचा विलासहि त्यांच्या ठिकाणी आढळतो. लेखणी हे त्यांच्य दृष्टीनें खड्ग होते, कुंचला नव्हता. पण त्यांच्या या खड्गाची मूठ रत्नजडित होती.या कुंचल्याच्या मोहक पण कृत्रिम रंगांना ज्यांचीं सर कधींच येणार नाहीं असें विलक्षण पाणी त्या खड्गाच्या तळपत्या धारेंतून चमकत होतें. बुद्धिवाद हाच उद्यांच्या सुखी मानवतेच्या जीवनाचा पाया झाला पाहिजे हें प्रतिपादन करितांना ते म्हणतात, 'विचारी पुरुषांनीं ही गोष्ट लक्षांत ठेविली पाहिजे कीं जे आचार चमत्कारिक धर्मकल्पनांवर बसवलेले असतात, ते विवेकाच्या कसाला लावून पाहण्यांत कांहीं अर्थ नाहीं. जे लोक तसल्या आचारांचे अनुकरण करीत असतात त्यांच्या मनांत त्यांच्या औचित्याचा विचार कधींच येत नाहीं. पूर्वापार चालत आलेल्या गाढ विश्वास-शृंखलांनीं निगडित होऊन गेल्यामुळे मागून आलेलें लोण डोळे