पान:Aagarakar.pdf/27

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१५ गोपाळ गणेश आगरकर

अंगांत घातली आहे, एक पंचा नेसून दुसरा डोक्याला गुंडाळलेला आहे आणि हातांतल्या चिलमीचे मनसोक्त सेवन चाललें आहे, अशा थाटांत बसलेली एक मूर्ति त्यानें पाहिली. आगरकरांकडे आलेला हा कोणीतरी कोंकणांतला भिक्षुक असावा असे वाटून त्या गृहस्थानें ऐटींत प्रश्न केला, 'आगरकर कुठे आहेत ? ' चिलीम ओढणा-या गृहस्थांनीं शान्तपणानें प्रतिप्रश्न केला, 'त्यांच्याशीं आपलं काय काम आहे ? ' तो गृहस्थ उत्तरला, "त्यांची कीर्ति ऐकून त्यांना भेटण्याकरितां मी आलों आहे.' पंचा नेसलेल्या आणि चिलीम ओढीत बसलेल्या त्या गृहस्थांनी त्याला उत्तर दिले," आगरकर म्हणतात तो मीच !'
आगरकरांच्या साधेपणाच्या मुळाशीं जें संयमाचे आणि सामाजिक जबाबदारीचे तत्त्वज्ञान होतें तेंच त्यांच्या आचारविचारात आणि उच्चारांत सदैव दिसून येत असे. ते स्वतः नाट्यकलेचे मोठे भोक्ते होते. पण त्यांचे सहकारी प्रो. वासुदेवराव केळकर हे महिना न् महिना जेव्हां एका नाटक मंडळीत मुक्काम ठोकूं लागले तेव्हां त्यांचे हें वर्तन आगरकरांना मुळींच आवडलें नाहीं. त्या वेळच्या नाटक मंडळ्यांत व्यसनी माणसांचा भरणा फार असे; त्यामुळे केळकरांसारख्या प्रोफेसरांनी एखाद्या नाटकमडळींत महिना न् महिना पडून राहणे अनेक दृष्टीनींं अनिष्ट होतें. या बाबतीतले आगरकरांचे खालील उद्गार अत्यंत मननीय आहेत. ते वरचेवर म्हणत, 'आम्ही विद्यार्थ्यांना शिकविणार, तयार करणार, आमचें आचरण पाहून विद्यार्थी तयार होणार, आम्हीच जर नाटकी आणि-व्यसनी लोकांत राहूं लागलों, त्यांच्यासारखेच झालों, तर आमच्यापासून आमचे विद्यार्थी शिकणार तरी काय ? हेंच का ?' समाजाचे नेतृत्व स्वीकारणाच्या मनुष्यानें-मग त्याचा पेशा शिक्षकाचा असो वा लेखकाचा असो, समाजसेवकाचा असो अथवा राजकारणी पुरुषाचा असो-शुद्ध चारित्र्याची चाड बाळगली पाहिजे या गोष्टीविषयीं त्यांचा केवढा कटाक्ष होती व तो किती यथार्थ होता हें या उद्गारांवरून दिसून येईल.
आगरकरांच्या विशुद्ध, उदात्त आणि प्रेरक व्यक्तित्वाचे असे किती तरी लहान मोठे आकर्षक पैलू दाखवितां येतील. विद्यार्थी, शिक्षक, लेखक, संपादक, आणि समाजसुधारक यांपैकी कोणत्याहि दृष्टीनें त्यांच्याकडे पाहिलें तरी