पान:Aagarakar.pdf/21

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

९ गोपाळ गणेश आगरकर


दहा वर्षातल्या अनेक प्रेमळ आठवणींनी व्याकुळ होऊन जात असेल. कितीतरी अविस्मरणीय रात्री त्यांच्या डोळ्यांपुढे पुनःपुन्हा उभ्या राहत असतील. सरकारी नोकरी न पत्करतां देशसेवेला वाहून घ्यायचे असा दोघांनीही डेक्कन कॉलेजांत एका रात्रीं निश्चय केला होता. विष्णुशास्त्र्यांशीं विचारविनिमय करण्याकरितां दोघेही पावसाळ्यांतल्या एका रात्रीं कॉलेजांतून गांवांत आले होते आणि थंडीनें कुडकुडत कॉलेजवर परत गेले होते. डोंगरीच्या तुरुंगांतल्या अनेक रात्री या दोघांनीं फिरून तुरुंगांत यावें लागलें तरी ज्या गोष्टी केल्याच पाहिजेत अशा गोष्टी कोणत्या हें निश्चित करण्यांत घालविल्या होत्या. आपणा दोघांची एकरूपता अभंग आहे असेंच ते मानीत आले होते. पण तत्वनिष्ठा ही एक अत्यंत कठोर देवता आहे. जीवनांतल्या अनेक नाजुक भावनांचा बळी घेतल्याशिवाय ती प्रसन्न होत नाहीं, हा अनुभव आगरकरांनाही यायचा होता. 'सुधारक' काढल्यापासून आगरकरांना टिळकांशीं अखंड झुंज घ्यावी लागली, त्यांचे कठोर वाक्प्रहार पदोपदीं सहन करावे लागले, आपल्या कार्यासाठी त्यांच्यावर लेखणीनें घाव घालावे लागले. हें करतांना त्यांच्या भावनाप्रधान मनाला क्लेश झाले नसतील असें कसें म्हणतां येईल ? पण त्यांच्या भावनाशीलतेनें त्यांच्या ध्येयनिष्ठेला कधींही दगा दिला नाहीं. मध्यरात्रीं कोंडाण्यावर चढणाऱ्या आणि प्राणांची पर्वा न करितां लढणाऱ्या तानाजीच्या वीरश्रीनें त्यांनी आमरण 'सुधारक' चालविला. तो चालवितांना त्यांनीं पैशाकडे पाहिलें नाहीं, कीं कीर्तीकडे लक्ष दिलें नाहीं. त्यांची नजर एका ध्रुवताऱ्यावर खिळली होती. तो तारा म्हणजे लोकजागृति हा. आपल्या समाजांत जी जो लहान मोठा दोष त्यांना दिसला, त्याच्यात्याच्यावर शस्त्रवैद्याच्या कुशलतेनें आणि त्याच्या हातांतल्या शस्त्रांना जी धार असते ती आपल्या लेखणीला देऊन त्यांनीं सदैव निर्भय टीका केली. राघोबादादाला देहांत प्रायश्चित्त सांगण्याचें अलौकिक नीतिधैर्य रामशास्त्र्याला आयुष्यांत एकदांच दाखवावें लागलें. पण जुन्याच्या भजनीं लागून गुलाम झालेल्या, परंपरा पवित्र असलीच पाहिजे या कल्पनेनें अंध होऊन पदोपदीं चांचपडत राहणाऱ्या आणि मंद बुद्धीनें व बधिर भावनांनीं जीवन कंठीत राहिल्यामुळें