पान:Aagarakar.pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तीन नद्यांच्या संगमाप्रमाणें तीन गुणी व्यक्तींचा संगमही दुर्मिळ असतो. महाराष्ट्राच्या सुदैवानें यावेळी हा अपूर्व त्रिवेणीसंगम घडून आला. टिळक, आगरकर आणि चिपळूणकर या तिघांच्या देशसेवेच्या संकल्पांतून ' न्यू इंग्लिश स्कूल' ही शाळा, व ' केसरी ’ आणि 'मराठा' हीं वृत्तपत्रें जन्माला आलीं. लोकजागृतीच्या ध्येयानें प्रेरित झालेले हे तीन तेजस्वी देशभक्त नव्या महाराष्ट्राच्या क्षितिजावर चमकूं लागले. पण दैवाला हा अपूर्व योग पाहवला नाहीं. दुर्दैवानें दोन वर्षांनी विष्णुशास्री वारले. पण विष्णुशास्त्र्यांच्या मृत्यूमुळें त्यांनी सुरू केलेल्या कुठल्याही कार्याला खंड पडला नाहीं. केसरीची गर्जना महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यांतून् निनादूं लागली. ‘ न्यू इंग्लिश स्कूल ' ची विलक्षण भरभराट झाली. टिळक-आगरकरांना बुद्धिमान् सहकारी लाभल्यामुळे लवकरच फर्ग्युसन कॉलेज जन्माला आलें. कॉलेजांत असतांना या जोडीनें देशसेवेचीं जीं उज्ज्वल स्वप्नें पाहिलीं होतीं, त्यांतलें एक एक सत्यसृष्टींत उतरूं लागलें. पण सत्यसृष्टि ही स्वप्नसृष्टीपेक्षां निराळी आहे.भावनेच्या भरांत आणि ध्येयवादाच्या धुंदींत या जोडीला आपण एकजीव आहों असें नेहमींच वाटत आलें होतें. आपल्या विचारांतल्या विरेाधाची आणि स्वभावांतल्या भेदांची त्यांना कल्पनाच नव्हती. भरतीच्या पाण्याखालीं लपलेले खडक तें पाणी ओसरूं लागतांच जसें वर डोकें करतात त्याप्रमाणे शाळा, कॉलेज, व वर्तमानपत्रें थोडीफार सुस्थिर होतांच ते सारे भेद आणि विरोध जाणवूं लागले.' केसरी' निघाल्यापासून त्याच्या लेखनाचा भार मुख्यत: आगरकरांनींच वाहिला होता. पण आतां सामाजिक विषयावर स्वतःच्या मनाप्रमाणे स्पष्टपणें ' केसरींत' लिहिणे त्यांना कठिण होऊन बसलें. तत्त्वनिष्ठ आगरकरांची कुचंबणा होऊं लागली. सामाजिक सुधारणेच्या बाबतीत रूढिग्रस्त समाजाला चुचकारून भागणार नाहीं, प्रसंगीं त्याच्यावर चाबकाचाही प्रयोग केला पाहिजे अशी त्यांची श्रद्धा होती. टिळकांना ही श्रद्धा मान्य नव्हती. आगरकरांनीं ' केसरी' सोडून दिला आणि 'सुधारकाची' स्थापना केली. 'केसरी' सोडतांना आगरकरांना किती दु:ख झाले असेल याची कुणालाही सहज कल्पना करतां येईल. टिळकांच्यासारख्या जीवश्चकंठश्च मित्राशीं अटीतटीचे विचारयुद्ध करतांनाही त्यांचें मन मागच्या