पान:Aagarakar.pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

\} गोपाळ गणेश आगरकर स्वारीनें अंगांतला सदरा धुवून वाळत घालावा आणि सकाळीं तो वाळला म्हणजे अंगांत घालावा ! अशा रीतीनें दारिद्र्य जणू कांहीं आगरकरांच्या सत्त्वाची परीक्षाच घेत होतें ! जीवनांतल्या सर्व परीक्षांत सत्त्वपरीक्षा नेहमींच अतिशय अवघड असते. इतर परीक्षांत उपयोगीं पडणाऱ्या बुद्धीच्या बळावर ती कोणालाही उत्तीर्ण होतां येत नाही. तिच्यांतून पार पडायला असामान्य आत्मबळच अंगीं असावें लागते. सुदैवानें आगरकरांच्यापाशीं तें भरपूर होतें. बी. ए. होईपर्यंतच्या तीन वर्षांत ते दारिद्र्याशीं अहोरात्र झुंजत राहिले. पण या झुंजीला कंटाळून त्यांनी आपला शिक्षणक्रम सोडला नाहीं; किंवा पदवीधर होतांच एखादी लठ्ठ पगाराची नोकरी मिळवून आतांपर्यंतच्या हालअपेष्टांचा वचपा भरून काढावा असा विचारही त्यांच्या मनाला शिवला नाहीं. कॉलेजांतल्या तीन वर्षांत त्यांच्या बुद्धीचा वेगानें विकास होत चालला होता. मिल्ल आणि स्पेन्सर त्यांनीं नुसते वाचले नव्हते; ते पचविले होते. आपला देश राजकीय गुलामगिरींत पिचत आहे, आपला समाज सामाजिक गुलामगिरींत कुजत आहे, हें ते हरघडी उघड्या डोळ्यांनीं पहात होते आणि त्याच्या उद्धाराची तळमळ त्यांना अस्वस्थ करून सोडीत होती. टिळकांसारखा त्यांच्याइतकाच निग्रही आणि देशप्रेमी मित्र त्यांना लाभला होता. या दोघा मित्रांनीं कॉलेजांत असतांनाच एके दिवशीं निश्चय केला-सरकारी नोकरी न पत्करतां देशसेवेंत आयुष्य घालवायचें. आगरकरांनीं आईला पत्र लिहिलें, ' आपल्या मुलाच्या मोठाल्या परीक्षा होत आहेत, आतां त्याला मोठ्या पगाराची चाकरी लागेल व आपले पांग फिटतील, असे मोठाले मनोरथ, आई, तूं करीत असशील. पण मी आतांच तुला सांगून टाकतों कीं विशेष संपत्तीची, विशेष सुखाची हांव न धरतां मी फक्त पोटापुरत्या पैशांवर संतोष मानून सर्व वेळ परहितार्थ खर्च करणार.' १८७९ च्या सप्टेंबर महिन्यांतल्या एका रात्रीं नारायण पेठेतल्या विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या घरीं नर-नारायणाची ही आधुनिक जोडी विचारविनिमयाकरितां आली. विष्णुशास्त्र्यांचा भाषाभिमान आणि देशाभिमान जाज्वल्य होता. निबंधमालेच्या पानापानांतून या अभिमानाचे स्फुल्लिंग उठत होते. सरकारी नोकरीच्या पाशांतून ते नुकतेच मोकळे झाले होते.