पान:Aagarakar.pdf/182

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आगरकर : व्यक्ति आणि विचार १६२
साहाय्य घेतलें असतां सर्वथैव नुकसान होणार आहे असें समजणाऱ्या. श्रद्धाळू पंडितमन्य, व देशाभिमानी म्हणवून घेणाऱ्या जनसमूहाच्या उप- हासाचे आणि रोषाचें स्थान त्यानें आपणांस करून घेतलें आहे. तथापि त्याला असा भरवसा आहे की, म्हणण्यासारखी द्रव्यानुकूलता नसतां, श्री. शिवाजीराव महाराज होळकरांनी देऊ केलेली दरमहा पांचशे रुपयांची नोकरी ज्यानें ' मला नको' म्हणून सांगितलें; विशेष बुद्धिसामर्थ्य किंवा शरीरसामर्थ्य नसंतां, आज दहा अकरा वर्षे जो उत्साहपूर्वक शिक्षकाचा आणि लेखकाचा धंदा करीत आहे; कवडीची किफायत नसतां, ज्यानें सात आठ वर्षे सर्वत्र प्रसिद्ध केसरीपत्राचे बन्या वाईट रीतीनें ' रकाने ' भरून काढले, इतकेंच नाहीं एका दुर्दैवी संस्थानिकास सुदशा यावी, येवढ्याच बुद्धीनें लिहिलेले लेख न्यायाधीशास अप्रशस्त वाटल्यामुळे त्यांनी दिलेली शिक्षा त्यानें आनंदाने साहिली; हाती असलेल्या पत्राचे मालक शुद्ध वाटेल तें लिहू देत नाहींत असें दिसून आल्याबरोबर त्यांच्या धमकावण्यांकडे बिल- कुल लक्ष न देतां समानशीलाच्या व विचारांच्या मित्राचें प्रोत्साहन व साहाय्य मिळतांच, सर्वतोमुखीं निंदा होत असलेल्या सुधारणेचा आणि सुधारकांचा पक्ष लोकांस वाटत असल्याप्रमाणे दुर्बल नाहीं, इतकेंच नाहीं तर त्याचेंच अखेरीस सर्वत्र साम्राज्य होणार आहे असें युक्तिवादानें सिद्ध करून देण्यासाठी कोणत्याही गोष्टीची अनुकूलता नसतां, व लोकमत घड- धडीत विरुद्ध असतां नवीन पत्राच्या नसत्या उठाठेवींत जो जाणूनबुजून पडला; रूढ धर्माचारांतील आणि लोकाचारांतील व्यंगांचे निर्भयपणे आविष्करण करण्याचें भयंकर पाप हातून घडत असल्यामुळे, देशाभिमानी व धर्माभिमानी म्हणविणाऱ्या पत्रांकडून होत असलेला शिव्यांचा व शापांचा प्रचंड भडिमार ज्याला व ज्याच्या निरपराधी स्त्रीला एकसारखा सोसावा लागत आहे; स्वमताचें मंडन व तदनुसार होईल तेवढे वर्तन करण्यासाठीं, आपल्या फार दिवसांच्या मित्रांचाचसा काय, तर रात्रंदिवस काळजी वाहून आणि कडेवर खांद्यावर खेळवून, ज्यांनी लहानाचें थोर केलें अशा अत्यंत ममताळू व पूज्य आसांचाही दीर्घ शेष ज्यानें आपणांवर करून घेतला आहे - अशा मनुष्याच्या लेखांत कितीही प्रमाद होत असले व केवढीही कटुता असली तरी ते समंजस मनुष्याच्या स्वल्प आदरास, निदान थोड्याशा अनु-