पान:Aagarakar.pdf/18

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आगरकर : व्यक्ति आणि विचार ६

म्हणून उभे राहतें. क-हाडला फक्त पहिल्या तीन इंग्रजी यत्ता असतात. गोपाळ तिसरी पास होतो. ' पुढे काय ?' हा प्रश्न त्याला भेडसावू लागतो. नाखुषीनें आणि नाइलाजानें तो मामलेदारकचेरींत उमेदवारी करूं लागतो. पण सरस्वतीच्या वीणेच्या मधुर झंकाराची कल्पना असलेलें त्याचे मन लेखणीच्या कारकुनी कुरकुरींत रमूं शकत नाहीं. तो उमेदवारी सोडून रत्नागिरीच्या आपल्या एका नातलगाकडे मोठ्या आशेनें जातो. त्या नातलगापाशीं पैशाची श्रीमंती असली तरी मनाची नाहीं, हा कटु अनुभव येतांच गोपाळ वार लावून शिकूं लागतो, प्रसंगीं धोतरें धुवून तो विद्यार्जनाला मदत मिळवितो. आधीं शागीर्द आणि मग शास्त्री हीं दृश्यें ज्याच्या आयुष्यांत दिसतात असा एखाददुसरा रामशास्त्री दर पिढीला निर्माण होत असतो. गोपाळ त्यांपैकींच एक होता. रत्नागिरीला आपला नीट जम बसत नाहीं असें पाहून तो कऱ्हाडला परत येतो. तिथे कांहीं दिवस तो कंपाउंडरचे काम करतो. इतक्यांत मामींच्या बरोबर सोबत म्हणून अकेल्याला जायची त्याला संधि मिळते. तहानेनें व्याकुळ झालेल्या माणसाला गंगा दिसावी तशी गोपाळाची स्थिति होते. तो अकोल्याला जाऊन पुढचा अभ्यास सुरू करतो. योग्य वेळीं तो मॅट्रिक होतो. पुन्हां मागचाच भयंकर प्रश्न-‘पुढे काय ?’-त्याच्यापुढें भुताप्रमाणें उभा राहतो. कॉलेजांत जायची इच्छा अतिशय उत्कट. पण जायचे कसें ? मदत कोण करणार? पर्वताचे उंच उंच शिखर गांठण्याची पांगळ्याची महत्त्वाकांक्षा-ती सफल झालेली कधीं कुणीं पाहिली आहे काय ?

  • * *

पण नेपोलियनप्रमाणे आगरकरांच्या कोशांतही अशक्य हा शब्द नव्हता. शिक्षकांनीं गोळा करून दिलेले साठ रुपये घेऊन गोपाळरावांनीं डेक्कन कॉलेजांत प्रवेश केला. शिष्यवृत्ति संपादन करून, वर्तमानपत्रांत लिखाण लिहून आणि वक्तृत्वसमारंभांत बक्षीस मिळवून त्यांनी आपला कॉलेजचा खर्च कसाबसा चालविला. अशा तुटपुंज्या मिळकतींत विद्यार्थ्याचे हाल हाल झाले नाहींत तरच नवल ! कित्येक वेळां त्यांनी एका सदऱ्यावर कॉलेजांतले दिवस काढले. तो दिंवसा धुवून वाळत घातला तर अंगांत घालायला दुसरा सदरा नाहीं म्हणून रात्रीं जिकडे तिकडे सामसूम झाल्यावर