पान:Aagarakar.pdf/178

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आगरकर व्यक्ति आणि विचार, १५८
सुधारकासारख्या नवीन पत्राचे जनन, रा. टिळक व पाटणकर यांचा पहिल्या तीन संस्थांशीं नुकताच घडून आलेला विश्लेष व प्रस्तुत वादांत सुधारक व केसरी पत्रांच्या चालकांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीनें एकमेकांवर चाल- विलेला भडिमार पाहून या उभयतांच्या बेबनावास व फुटाफुटीस झालेली कारणें त्यांस ठाऊक नसल्यामुळें विषाद वाटणें हें फार स्वाभाविक आहे. पण रा. टिळकांस तीं कारणें अवगत असतां, ज्या पत्राचें आधिपत्य त्यांचे- कडे आहे त्याच्या गेल्या अंकांत ' ज्यांना वादांत स्वपक्षाची उणीव झांकण्या- साठीं परपक्षावर, आणि विशेषतः त्यांतील एकदोन व्यक्तींवर, अपशब्दरूपी गोळीबार करणें हीनपणाचें वाटत नाहीं त्यांची कानउघाडणी करण्याच्या नादास लागणेही व्यर्थ होय. सार्वजनिक विषयावरं वादविवाद करण्याच्या मिषानें खाजगी द्वेषाचें उट्टे काढण्याची अमूल्य संधि क्वचितच मिळते. ' अर्शी दोन वाक्यें आहेत. हीं वाक्यें जेव्हां आमच्या नजरेस पडलीं तेव्हां मात्र आम्हांस मोठा विस्मय वाटला ! टिळक आणि आगरकर यांचा खाजगी द्वेष ! आणि तो कशासाठी ? टिळक आगरकरांचे किंवा आगरकर टिळकांचें कांहीं एक लागत नाहींत, आणि म्हणून एकाला दुसऱ्याचा 'खाजगी द्वेष ' करण्याचें कारण आजपर्यंत झालेलें नाहीं इतकेंच नाहीं तर त्यांपैकीं निदान एकाच्या मतानें तरी तें केव्हांच होण्याचा संभव नाहीं. त्या दोघांचा बेबनाव व फुटाफूट होण्यास ज्या समाईक संस्थांचे ते दोन सेवक होते, त्या संस्था चालविण्याच्या पद्धतीविषय व त्यांच्या उत्कर्षाच्या साधनां- विषय कोणत्याही रीतीनें एकवाक्यता न होणारा त्यांचा मतभेद कारण झाला व याच मतभेदामुळें, प्रस्तुत वादांत ते एकमेकांची मुक्त न ठेवतां, आपापल्या मतांचा आणि पक्षांचा विजय होण्यासाठी अन्योन्यांवर तुटून पडत आहेत; दुसरें कांहीं नाहीं ! अशा रीतीनें आपापल्या देशविषयक विचारांचे प्राबल्य स्थापण्यासाठी अंतःकरणपूर्वक झुंझणाऱ्या लढवय्यांचे संग्रामचातुर्य पाहत राहून व कौतुक करावयाचे विसरून जाऊन, अशा युद्धप्रसंगी केवळ कर्णकटु टणत्कारांच्या श्रवणावरूनच प्रेक्षकांनीं ' एकाला दुसऱ्याचा मत्सर उत्पन्न झाला आहे, ' किंवा कोणी कोणाचें ' खाजगी द्वेषाचें उट्टे काढून घेत आहे,' असा कुतर्क करणे अत्यंत अनुदार होय ! एका जननीच्या उदरांतून अवतरलेल्या सहोदरांत देखील जर भांडण किंवा