पान:Aagarakar.pdf/171

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१५१ विविध विचारे

सांपडलेल्या लुटीपासून आपले हित करून घेणें या गोष्टीस किती साहाय्य होणार आहे, हें अद्यापि नीट दिसूं लागलें नाहीं, कितीहि समजावून सांगि- तलें तरी समजत नाहीं, व कानाशी कितीहि ओरडलें तरी ऐकूं येत नाहीं ! असल्या लोकांस समजविण्यास, पाइविण्यास व ऐकविण्यास, लेचेपेचे प्रयत्न उपयोगी नाहींत. देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत चळवळ करून तिच्या दंग्यानें यांची डोकीं भणाणून सोडली पाहिजेत.

XXX
१४. ऐसें कैसें रे सांवळें

 ज्यांना आपल्या सोंवळ्याओवळ्याची हास्यास्पदता पहावयाची असेल त्यांनी पुढील विशिष्ट उदाहरणांकडे किंचित् नजर फेंकावी. हरणाच्या कात- ड्यास पवित्र समजून आम्ही त्याचे तुकडे जानव्यांत घालतों. वृद्ध संन्यासी त्यांचे जोडे करतात, व ते घालून ओंवळे न होतां पुडीस जातात ! पूजा- ब्रह्मयज्ञादि धर्मकर्मे करण्यास या कातड्यांसारखी पवित्र आसनें नाहींत ! यासंबंधानें आमचा असा प्रश्न आहे की, हरणाच्या किंवा वाघाच्या कातड्या- सच इतकी शुचिर्भूतता कोठून आली ? ज्या गाईंच्या मूत्रप्राशनानें आणि मल- लेपनार्ने आम्ही आपणांस श्रावणमास पुनीत करून घेत त्या गाईच्या कात- ड्यात हरणाच्या कातड्याइतकी पवित्रता कां नसावी ? तसेंच यज्ञांत ज्याचें मांस-भक्षण करून आम्हांस अनंत पिढ्यांचा उद्धार करतां येतो, व कदाचित् जन्ममरणाच्या क्लेशापासून सोडवणूक करून घेता येते; त्या आजच्या उबदार व कमावलेल्या कातड्यास हरणाच्या कातड्याइतकें पवित्र मानून संध्यादि कर्मे करतांना त्याची आसनें कां वापरू नयेत ? आतां तंतुपटाच्या सोंवळ्या- ओवळ्याची थोडीशी चिकित्सा करूं. सध्यां यासंबंधानें सोवळ्याच्या ज्या कल्पना रूढ आहेत, त्यांप्रमाणें नव्या धोतरास विटाळ नाहीं; कुणब्याच्या स्पर्शानें धोतरें विटाळत नाहीत; क्षौर करवून अंगरखा व पागोटें घालण्यास प्रत्यवाय नाहीं ! याप्रमाणें वनस्पतीपासून उत्पन्न होणाऱ्या तंतूंची हालहवाल आहे. या सदरांत कागद, बोटवाती, सूतपुतळ्या वगैरे कापसाच्या चिल्हर वस्तूंचा समावेश करण्यास हरकत नाही. शाईचा ठिपका पडला कीं, कोरा कागद सोंवळा झाला ! जणूं काय या कृष्णकलंकांतच शुचिर्भूतत्व आहे.