पान:Aagarakar.pdf/168

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आगरकर : व्यक्ति आणि विचार १४८

११. बोलके सुधारक कांहीं नवीन नाहींत.

 सुधारणानिंदकांचा एक असा भ्रम आहे कीं, बोलके सुधारक काय ते अलीकडेच दृष्टीस पडूं लागले आहेत. पण खरी गोष्ट तशी नाहीं. सुधार- कांची ही जात पूर्वीपासून आहे ! उदाहरणार्थ, आपले पुराणिक, हरिदास भिक्षुक, कर्मठ शास्त्री, जोशी किंवा अशाच प्रकारच्या दुसऱ्या कोणत्याही वर्गातील लोक घ्या. लोकांस धर्मोपदेश करावा, त्यांस नीति पढवावी, व स्वतःच्या पवित्र व शुद्ध आचरणाने लोकांस उदाहरण घालून द्यावें, हें या पूर्वपद्धतीच्या सुधारकांचें कर्तव्य होय. पण हें कर्तव्य नीट बजावणारे असले किती सुधारक निघतील बरें ? स्त्रियांस मंत्रोपदेश करण्याच्या निमित्तानें त्यांस व्यभिचारपंकांत गूढ गौवून टाकणारे, पोथीपुढे ठेवलेल्या तांदुळाचें गाठोडें बाजारी अंगवस्त्राच्या घरीं नेऊन सोडणारे, लोकांस निर्लोभाच्या गोष्टी सांगून घरांतल्या घरांत किंवा परक्याच्या घरीं हवा तसला अनाचार करणारे किंवा पैशासाठी प्राण सोडणारे, अथवा भस्माचे लांबलचक पट्टे, मुद्रांचे छाप, दर्भाच्या मुष्टी, शालजोड्यांचे लपेट, रेशीमकांठी धोतरांच्या नीया, रुद्राक्षाच्या स्फटिकांच्या माळा, टाळ व करताल इत्यादी वाद्ये, नाना प्रकारचीं भजनें व नाच गीत, व जीवात्मा आणि परमात्मा यांतील भेदाभेदाविषयीं कधीं कधीं न समजणारी व कधीं समजणारी चर्चा इत्यादि धार्मिकपणाच्या दिखाऊ साधनांनी बायाबापड्यांस व अज्ञ पुरुषांस बुचाडणारे पहिल्या चालीचे दुर्वृत्त दांभिक सुधारक काय थोडे आहेत ! पण त्यांना शेणमार करण्याची, अपंक्त करण्याची किंवा अलीकडील, बोलक्या सुधारकांवर जी वाक्यशरांची वृष्टि होत असते तशा प्रकारची वृष्टि त्यांवर करण्याची इच्छा कधीं कोणास झाली आहे काय ! कधीं नाहीं. कारण चांगली गोष्ट हातून प्रत्यक्षपणें न घडली तरी ती सांगत फिरणें हा कांहीं दोष नाहीं, असा मनुष्यांचा पक्का समज हाऊन गेला आहे, असें त्यांच्या अशा प्रकारच्या आचरणावरून उघड होतें. तेव्हां सुधारणा निंदकांनी सध्यांच्याच बोलक्या सुधारकांवर इतकें तुटून पडणें शुद्ध वेडेपण होय. वाद करतां करतां ज्या चांगल्या गोष्टी ठरतील त्यांचा अंगीकार त्याच्याकडूनचसा काय, खुद्द सुधारणानिंदकांकडूनही हळू हळू होत जाईल, अशी आमची खात्री आहे !