पान:Aagarakar.pdf/167

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१४७ विविध विचार

लक्षांत नीट न येत असल्यामुळे व आपण ज्या स्थितांत आहाँ तीच स्थिति अत्युत्तम असें अप्रबुद्ध जनावरांप्रमाणे त्यांस वाटत असल्यामुळें, कोणत्याही रीतीनें त्या स्थितींत बदल करूं पाहणारांचा ते द्वेष करतात, आणि त्यांचे श्रम निष्फळ होण्याचा आपल्याकडून होईल तेवढा प्रयत्न करतात. अशा नित्य कलहामुळें समाजांतील अवयवांचे प्रथम दोन स्थूल विभाग होतात; एक पुराणप्रियांचा व दुसरा सुधारकांचा. पुढे दुस-याचे दोन पोटभेद होतात; एक बोलकथा सुधारकांचा व दुसरा वागत्या सुधारकांचा. ज्या वेळेस काहीं केलें तरी समाजांतील बहुतेक लोक चांगल्या गोष्टीचा विचार करावयाचे नाहीत-इतकेंच नाहीं, तर जो ती करण्यास प्रवृत्त होईल त्याचा ते छळ करण्यासही सोडीत नाहीत, अशी स्थिति असते, त्यावेळेस बहुधा अनेक प्रकारचे हाल व जाचणुकी सोसून व गरज पडल्यास निराळी जात करून घेण्यास किंवा मरण्यासही तयार होऊन, आपल्या विचाराप्रमाणे आचरण करण्यास प्रवृत्त होणारे मताभिमानी सुधारक फार निघतात. आजपर्यंत नवीन धर्मपंथाचे जे स्थापक झाले आहेत, त्यांचा इतिहास बहुधा अशा प्रकारचा आहे. साक्रेतीस, बुद्ध, महंमद, ख्रिस्त, ल्यूथर, राममोहन किंवा दयानंद यांपैकीं लहानमोठ्या प्राचीन किंवा अर्वाचीन पाहिजे त्या महापुरुषाचे चरित्र घ्या, त्यावरून असें दिसून येईल कीं, ज्या सुधारणा झाल्याच पाहिजेत असा त्यांच्या मनाचा दृढ ग्रह झाला होता, त्या सुधारणांस तत्कालीन बहुजनसमाज अत्यंत प्रतिकूल असल्यामुळे, एक तर आपला हेका आपण सोडावा, किंवा लोक जेवढा त्रास देतील तेवढा सहन करण्यास तयार होऊन आपला हेका आपण चालवावा - याशिवाय त्यांना दुसरा मार्गच नव्हता. अशा स्थितीत लोकांच्या निष्टुर दुराग्रहामुळेंं सुधारकांच्या अंत:करणांत पेटलेली ज्वाला लोकांच्या उपरोधक पुंकरांनीं न विझतां अधिक जोरानें भडकूं लागते, आणि ती त्या सुधारकांस मनाप्रमाणें आचरण करूं लागल्याशिवाय चैन पडूं देत नाहीं. मनाची अशी अवस्था झाली असतां, विचाराप्रमाणे न वागण्यापेक्षां लोकांनी केलेला छळ सोसणे, हेंच त्यांना अधिक सह्य व सुखावह वाटतें.