पान:Aagarakar.pdf/158

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आगरकर : व्यक्ति आणि विचार १३८
जो ती तशी होत जाईल तो तो खरी उन्नति होऊं लागली असें म्हणतां येऊं लागेल. येवढे खरें आहे कीं, कांहीं झालें तरी सर्वांच्या बुद्धि सारख्या तीव्र होतील व पाहिजे त्या कामांत पाहिजे त्याला पडतां येऊन र्ते उत्तम रीतीने वठवितां येईल, असें पूर्णपणे होण्याचा संभव फार थोडा आहे. तथापि प्रस्तुतकाल निरनिराळ्या वर्गातील लोकांत व स्त्रीपुरुषांत जे विलक्षण अंतर दृष्टीस पडत आहे तें पुष्कळच संकुचित करता येणार आहे; आणि ज्या देशांत तें तसें करण्याचा प्रयत्न झपाट्याने चालत राहील तेच देश अखेरीस तगतील. बाकीचे सर्वत्र जो जीवनार्थ कलह मोठ्या निकराने चालला आहे त्यात भांडतां भाडतां नाहींसे होतील. यासाठीं ज्यांना है अस्तित्वतत्त्व स्पष्टपणें कळून आले असेल व ज्यांच्या मनांत कर्तव्यबुद्धि व परोपकारबुद्धि पूर्णपर्णे जागृत झाली असेल त्यांनी आपापल्या देशाचा जीवनार्थ कलहात टिकाव लागण्यासाठी, रात्रंदिवस निरपेक्ष बुद्धीनें झटलें पाहिजे. अशा प्रकारचे विचार समजले असून जे स्तब्ध राहतील त्यांच्या माथ्यावर देशास विपद्दशा आणिल्याची, आणि त्याचा नाश अपरिहार्य केल्याची भयंकर जबाबदारी येणार आहे; म्हणून सुशिक्षित देशबांधव हो, जर तुम्हांस इतर देशांकडून व पुढील संततीकडून बरें म्हणून घ्यावयाचें असेल व तुमची आज जी स्थिति आहे, तीहून तुमच्या मुलांची व नात- वंडाची स्थिति अधिक वाईट होऊं नये अशी तुम्हांस वास्तविक इच्छा असेल, तर ज्या दुर्मतांनी, दुराग्रहानी व दुराचारानीं महारोगांप्रमाणे या देशाच्या बुद्धीचा, नीतीचा व शरीरसामर्थ्याचा हजारों वर्षे फडशा चाल- विला आहे, त्यांचें यथाशक्ति निर्मूलन करण्याचा तुम्ही प्रयत्न करणे अत्यंत उचित होय.

XXX
जसा समाज तसा राजा

राज्याचा व धर्माचार सामाजिक आचारांपासून उत्पन्न होत असल्या- मुळें समाजाच्या प्रथमावस्थेतील धर्म आणि राज्य यांचे स्वरूपछि वर निर्दिष्ठ केलेल्या रानटी सामाजिक आचारांच्या स्वरूपासारखेच असतें. सध्यां आप - णास गुलाम, गुन्हेगार आणि शत्रु यांतील भेद नीट समजतो, व एकाच्या