पान:Aagarakar.pdf/157

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१३७ विविध विचार

अशा विशेष असते. वारुळांत जशी एक खुशालचेंडू राणी मुंगी असते म्हणून सांगतात, तीसारखे सुखपरायण हे लोक होत. सुखोपभोगासाठी सर्व प्राणि- मात्र वडपडत असतो, व ज्यास जो प्राप्त होईल त्याने त्यापासून आनंद करून घ्यावा, हे योग्य आहे; पण ज्या सुखोपभोगामुळे निरंतर तो घेता येण्याची शक्यता नाहींशी होते; बुद्धीस मांद्य येतें; गात्रें निःशक्त होतात; उत्साह नाहींसा होतो; आणि कुटुंबास व राष्ट्रास कोणत्याही प्रकारचा फायदा न होतां उलट नुकसान किंवा त्रास सोसावा लागतो, सुखोपभोगात निमग्न असण्यात काय फायदा आहे बरें ? पण असे लोक कोणत्यादी देशांत थोडेथोडके नसतात. ज्या ठिकाणीं अविद्या आणि वित्त याचा संयोग दृष्टीस पडतो, त्या ठिकाणी व्यसनासक्ति दृष्टीस पडत नाहीं असें सहसा होत नाहीं. सुदैवानें ज्याना सुखोपभोग करून घेता येत असेल त्यांनीं सुखाची निवड करताना ती आपणांस व इतरास शेवटपर्यंत हितावह होतील किंवा नाहीं, येवढे पहात जावें म्हणजे झाले. या सुखपरायण वर्गा- शिवाय लोकांचा आणखी एक तिसरा वर्ग असतो. या वर्गांतील लोकांची क्रियाप्रवृत्ति फार जबरदस्त असते, व एका दृष्टीने यास समाजाचे आधार- स्तंभ म्हणता येईल. यांनी काबाडकष्ट करून आवश्यकतेचे आणि चैनीचे पदार्थ उत्पन्न करावे, आणि त्यांचा उपभोग वरील दोन वर्गांतील किंवा मधल्या वर्गांतील लोकान घ्यावा, अर्से आजपर्यंत बऱ्याच अंशीं होत आले आहे व पुढेही अल्प काळांत या स्थितीत विशेष फेरबदल करता येईल असें वाटत नाहीं. तथापि निरपेक्ष बुद्धीने व आस्थापूर्वक परिश्रम केले असतां, ही असमता थोड्या वर्षांत बरीच दूर करतां येण्यासारखी आहे. ज्या देशांत ही असमता वाढत जाऊं लागली असेल, त्या देशाच्या -हासास आरंभ झाला आहे, असें समजावें. जेव्हां त्या असमतेची परमावधि होते, तेव्हा घनघोर राज्यक्रांति होऊन समाजचे समाज लयास जातात, धुळीस' मिळतात, किंवा त्यांत अपूर्व स्थित्यंतरे होतात.
 विचार करणारे, उपभोग घेणारे व काम करणारे असे जे सांप्रतकाली प्रत्येक देशांत तीन ठळक वर्ग दृष्टीस पडतात ते कायमचे नव्हत. हळू हळू प्रत्येक व्यक्तीस विचार, उपभोग आणि काम हीं समप्रमाणानें करावी लागून, सान्याच्या सुखानुभवाची इयत्ता सारखी होत जाणार आहे; व जो
९ आ.