पान:Aagarakar.pdf/152

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आगरकर : व्यक्ति आणि विचार १३२
हें पाहून या विरह व्यथेनें पीडलेल्या तरुणींना फार खेद होत असे, तथापि त्या बऱ्यावाईटानें आपला दिवसाचा वेळ कसा तरी काढीत. पण रात्र येऊन जिकडे तिकडे सामसूम झालें व त्या आपल्या आंथरुणावर पडल्या म्हणजे पतिचिर्तेत त्या इतक्या व्यग्र होऊन जात कीं, उभ्या रात्रींत त्यांचा डोळा लागत नसे. अशा स्थितीत उन्हाळा गेल्यावर पावसाळ्याच्या आरं- भास तरी आपले पति परत येतील, आणि आपली त्यांची गांठ पडून आपणांस आनंदाचा दिवस दिसेल, अशा आशेवर त्या वसंत व ग्रीष्म ऋतूंतील अत्यंत प्रखर दिवस व रमणीय रात्री मोठ्या कष्टानें लोटीत असत. हे ऋतु निघून जाऊन पावसाळ्याच्या आरंभास त्यांचे पति परत आले तर सारें ठीकच असे. पण दुर्दैवाने जर तसे घडलें नाहीं, तर मात्र त्यांच्या दुःखास व चिंतेस पारावार नसे. याप्रमाणें अनेक वर्षे वाट पाहिल्यावर, पति परत येत नाहींत, असें कामग्नीनें करपून गेलेल्या या तरुणींची काय अवस्था होत असेल याची वाचकांनीच कल्पना करावी. अशा संकटांत सांपडलेल्या तरुण कन्यका अखेरीस निराश होऊन वांकडे पाऊल टाकण्यास तयार होत आणि सखीच्या साह्यानें संकेतस्थानीं पाहिजे तसलें धाडस करून वल्लभांच्या गांठी घेत आणि अप्रशस्त रीतीनें आपले मनोरथ पूर्ण करीत, व अशी स्थिति अनेक कुटुंबांत दृष्टिगोचर होत असल्यामुळे तिचें प्रतिबिंब तत्कालीन काव्यांत व संगीतांत पडलें आहे, असें वुइलर्ड साहेबांचे म्हणणे आहे.
 याशिवाय आम्हांत रूढ असलेलें बहुपत्नीकत्व हैं आमच्या स्त्रिया व्यभिचारी असण्याचें दुसरें कारण आहे, असे या गृहस्थाचें मत आहे, व तें कांहीं खोटें नाहीं. एका पुरुषा दोघी नारी । पाप वसे त्याचे घरीं ॥ ही तुकारामोक्ति जर आमच्या लोकांस मान्य असेल तर एकाच पुरुषानें तीन किंवा चार बायका करण्याची चाल ज्या वेळीं रूढ असेल त्या वेळेस प्रत्येक स्त्री आपल्या पतीचें सारें प्रेम आपणांवर असावें म्हणून खटपट करीत असल्यामुळे, सापत्नमत्सर विकोपास जाऊन कुटुंबांतील शांततेचा नाश होत असेल इतकेंच नाहीं, तर ज्या दुर्दैवी तरुणी आपल्या पतींच्या नजरेंतून उतरल्या जात असतील त्यांचे मन त्यांच्या संसाराकडे न लागतां बाह्यसुखाकडे जाऊं पाहात असेल, असें मानण्यास काय हरकत आहे ?