पान:Aagarakar.pdf/150

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आणखी एक शहाण्याचा कांदा १६

 लॉर्ड इलियम बेंटिंक याचे कारकीर्दीत कॅप्टन ऑगस्टस वुइलर्ड म्हणून एक उत्तर हिंदुस्थानांत लष्करी अधिकारी होता. याच्या ग्रंथावरून त्याला गाण्याचा शोक फार असावा असें दिसतें. यानें आमच्या गायनशास्त्राविषयीं जो अभिप्राय दिला आहे त्यावरून त्याची शोधकबुद्धि व्यक्त होते इतकेंच नाहीं, तर त्याला आपल्या गाण्याचें मर्महि बरेंच समजलें होतें असें दिसतें. याने आमच्या गायकांविषयीं, वाद्यांविषयीं व संगीतकलेविषयीं जे लिहिलें आहे वाचून त्याविषयीं आपल्या अंतःकरणांत कृतज्ञता उत्पन्न झाल्या- तें खेरीज राहणार नाही. पण तो येवढेच करून स्वस्थ बसला नाहीं, हें फार वाईट झालें. 'हिंदुस्थानचे संगीत' या नांवाच्या ग्रंथांत त्याला आमच्या गाण्याविषयीं जे लिहावेंसें वाटलें तें लिहून गेल्यावर, अनेक संगीतांच्या भाषांतरापासून आमच्या जुन्या चालीरीती कशा प्रकारच्या असाव्या, याचे अनुमान करण्याचा प्रयत्न त्यानें केला आहे व त्यांत तो अगदी फसला आहे. कोणत्याहि देशांतील लोकांच्या काव्यावरून किंवा तालसुरांत बसवि- लेल्या पद्यांवरून त्या लोकांच्या नीतीविषयीं, विशेषतः लिंगविषयक नीति- विषय, अभिप्राय देणें मोठें साहस होय, असें आम्हांस वाटतें. कारण शृंगार' हा काव्याचा प्रधान विषय असल्यामुळे, आणि अतिशयोक्ति हा काव्यरसात्मा होऊन बसल्यामुळे; काव्यांतर्गत स्त्री-पुरुषांच्या उद्गारांवरून कोणत्याही लोकांच्या नीतिमत्तेविषयीं अटकळ करूं गेल्यास तींत प्रमाद होण्याचा फार संभव असतो. 'मिस्टरीज ऑफ धी कोर्ट ऑफ लंडन' या रेनॉल्डकृत ग्रंथमालिकेवरून इंग्लिश लोकांच्या नीतीविषयीं मत देणें न्याय्य होईल काय ? संभावित इंग्लिश लोक उघडपणें ही कादंबरी वाचीत नाहीत, व लोकांच्या दृष्टीस पडतील अशा ठिकाणी तिचीं ' व्हाल्में ' ठेवीत नाहीत; कारण बीभत्स शृंगार त्यांत ओतप्रोत भरला आहे, असें सांगतात ! तेव्हां ज्याप्रमाणें मिस्तरीचीं पुस्तकें आंग्ल नीतीवर निबंध लिहिण्यास बसलें असतां आधारभूत मानितां येणार नाहीत, त्याप्रमाणेच उत्तर हिंदुस्थानांतील