पान:Aagarakar.pdf/143

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 १५३ काळजापर्यंत पोहोंचलेली जखम
जनावरांस लागणाऱ्या मिठासारख्या वस्तूंवरील कर थोडाबहुत कमी कर, याप्रमाणे निरनिराळ्या ठिकाणीं निरनिराळ्या प्रसंगी क्षुद्र सुधारणा करण्यांत येतात. पण अशानें कोठें अन्नास मोताद झालेलीं व उपाशी मरूं लागलेलीं कोट्यवधि माणसें खाऊनपिऊन सुखी होणें शक्य आहे काय ? जाऊन ठेपलेली जखम नुसत्या मलमपट्टीने कशी भरेल ? प्रसंगविशेषीं कांहीं कांहीं विशिष्ट कारणामुळें अशी जखम एकाएकीं वाहूं लागली तर कदाचित् असल्या पट्ट्यांनीं तिचें तोंड कांहीं वेळ दाबून धरवेल. पण पुनः कांहीं कारण झालें कीं, ती फिरून वाहूं लागणारच. यासंबंधानें आमची प्रकृति बरीच दुरुस्त होण्यास आम्हांस चारदोन चांगलीच टॉनिकैं ( रक्तवर्धक व शक्ति- वर्धक औषधे) मिळाली पाहिजेत. कापूस, धान्य, लोखंड, तांत्रें, जस्त, पितळ वगैरे अत्यंत उपयोगी धातू, शेतकीस व इतर साध्या धंद्यांस लागणारी यंत्रे-वगैरे पांचचार स्थूल वस्तूंचे व्यापार पूर्णपणें आमच्या हाती आल्या- शिवाय आम्ही आपली कात टाकून ताजेतवाने होऊं शकणार नाहीं. असले व्यापारच आमची रक्तवर्धक औषधें होत. पण हीं आम्हांस आमच्या राज्य- कर्त्यांपासून मिळण्याचा फारसा संभव दिसत नाहीं. फ्रान्स, युनायटेड स्टेट्स, जर्मनी, इटली, रशिया, जपान, स्वित्झरलंड - फार काय पण खुद्द इंग्लंड वगैरे देशांनी आपल्या व्यापाराच्या बाल्यावस्थेत त्याच्या वाढीकरितां सरकारच्या मार्फत काय काय प्रयत्न केले व अजूनही त्या त्या देशांतील तारुण्याप्रत पावलेल्या व्यापारास प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष केवढी मदत मिळत आहे, हैं पाहिलें तर इंग्लंडच्या व्यापारास धक्का बसेल या भीतीनें आमच्या व्यापारास मिलसारख्या अर्थशास्त्र्यांनीं ज्या प्रकारच्या उत्तेजनाची आवश्य- कता व सयुक्तिकता आपापल्या ग्रंथांत प्रतिपादिली आहे व ज्या प्रकारचें उत्तेजन अमेरिकेतील स्वतंत्र संस्थानांच्या किंवा जपानच्या सरकारी अधि- काऱ्यांनी आपल्या व्यापारांस देऊन त्याची भरभराट करून सोडली आहे, त्या प्रकारचें उत्तेजन आमच्या व्यापारास देण्याबद्दल येथल्या किंवा इंग्लंडांतल्या प्रमुख अधिकाऱ्यांपुढें तुम्हीं केव्हांही गोष्ट काढिली तर ते आपल्या दोनही कानांवर घट्ट हात ठेवून, दांभिकपणानें ' शांतं पापम् ' या मंत्राचा जप करीत सुटतील !! जणूं काय, लोकांच्या पैशानें लोक ' करा म्हणून प्रार्थना करीत असलेली ' गोष्ट करण्यास प्रवृत्त होणें हें महापातक