पान:Aagarakar.pdf/139

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

११९ गुलामांचे राष्ट्र
उंचीच्या भराया हव्या त्या दिशेनें मारूं दिल्यामुळे, ते पराकाष्ठेचे काल्प- निक लोक ठरले आहेत इतकेंच नाहीं, तर त्यांनीं आपल्या शौर्यानें जे परा- क्रम केले व बुद्धिसामर्थ्यानें ज्या अनेक शास्त्रांचे पाये घातले, ते आज अडीच तीन हजार वर्षोनंतर शोधक विचारी लोकांच्या प्रशंसेस पात्र होत आहेत ! तसेच, राजकीय विषयांत रोमन लोकांनी जी कीर्ति संपादिली, ती मनुष्यजातीच्या अन्तापर्यंत टिकेल असें खात्रीनें म्हणतां येणार आहे. युरोपांतील अर्वाचीन राष्ट्रें आज हजारपांचशे वर्षे प्लेटो, अरिस्टॉटल, जस्टि- निअन वगैरेंच्या ग्रंथांचे प्रेमपुरस्सर चालन व अध्ययन करीत आहेत, पण अजून त्यांची तृप्तीच झाली नाहीं, तेव्हां त्यांचा त्यांस कंटाळा येण्याचें नांव कशाला पाहिजे ? बरें, पण अलीकडील युरोपिअन लोकांना ग्रीक व रोमन लोकांविषयीं येवढी पूज्यबुद्धि आहे, म्हणून ते त्यांचें दोषाविष्करण करण्यास मार्गेपुढें पहातात, असें मात्र कोणी समजतां कामा नये. त्यांच्या करामती- बद्दल ते त्यांची अतिशय प्रशंसा करतात हें जरी खरें आहे, तरी त्यांची प्रमादस्थलें ते कधींहि छपवीत नाहीत. असा प्रकार कोणाकडून झालाच तर तो थोडा बहुत तिकडील धर्माभिमान्यांकडून होतो ! आमची गोष्ट याहून अगदीं निराळी आहे. जें जे म्हणून जुने आहे तें सारें आम्हांस निर्दोष, पूज्य व संरक्षणीय वाटते. आमच्या मनाच्या या खोडीमुळें जमि- नति खोल पुरलेल्या खांबाप्रमाणे आमची स्थिति झाली आहे ! जुन्या वेदान्ता- पलीकडे वेदान्त नाहीं जुन्या गणितांपुढे गणित नाहीं; जुन्या अलंकारा- हून अलंकार नाहींत ; जुन्या व्याकरणापुढे गति नाहीं; जुन्या न्यायापेक्षां दुसऱ्या न्यायांत अर्थ नाहीं ! असल्या भ्रमामुळे आमचे डोळे बांधल्यासारखे होऊन आज कित्येक शतके तेल्याच्या बैलाप्रमाणे आम्ही जुन्या शास्त्रांच्या आणि पुराणांच्या घाण्याभोवती घिरट्या घालीत आहों ! हें आमचें परिभ्रमण केव्हां संपेल तें संपो; पण यांतून सुटका झाल्याखेरीज कोणत्याही शास्त्रांत किंवा कर्लेत आमचें पाऊल पुढे पडण्याचा संभव नाहीं ! ( सायणाचार्य, पाणिनी, मंट, दंडी, चरक, सुश्रुत, भास्कराचार्य वगैरे फार मोठे पुरुष होऊन गेले असें रोज सकाळी उठून म्हणा आणि त्यांस व त्यांच्या ग्रंथांस पाहिजे तर साष्टांग नमस्कार घाला. पण यापलीकडे त्यांच्या नांवाचे पवाडें गात बसण्यांत किंवा त्यांच्या ग्रंथांना पुनःपुनः प्रेमानें कवटाळण्यांत काय