पान:Aagarakar.pdf/137

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

११७

गुलामांचे राष्ट्र


आशा करणें शुद्ध वेडेपण होय. पृथ्वीवर आजपर्यंत जे स्वतंत्र व सुखी देश होऊन गेले आणि आजमितीस ज्या देशांत तीं सुर्खे नांदत आहेत, त्या देशांत मधून मधून स्वतंत्रपणे विचार करणारे अनेक पुरुष होऊन गेले व होत आहेत, हें स्पष्टपणे दाखवितां येणार आहे. अशा पुरुषांकडून वेळोवेळी बन्यावाइटाची चर्चा झाल्याखेरीज कोणत्याही देशाची प्रगति होण्याचा संभव नाहीं. अपसर्गकारी कारणांचा लय आणि उत्सर्ग कारणांची उत्पत्ति व अभिवृद्धि झाल्याशिवाय जिला आपण सुधारणा म्हणतों ती कशी होणार ? ज्या गोष्टीपासून त्रास किंवा अडचण होते त्या दूर करणें, आणि ज्यापासून सोय व सौख्य होते त्या जवळ आणणे याचंच नाव सुधारणा. तेव्हां चांगल्या गोष्टी कोणत्या व वाईट कोणत्या, याचा विचार करण्यास जर कोणी तयार नसेल व यदाकदाचित् तसें करण्यास कोणी प्रवृत्त झाला असतां त्याची विटंबना होईल, तर चांगल्या वाइटाचें परीक्षण होणार कसें, आणि जें चांगलें असेल तें लोकापुढें येऊन तें त्यांच्या अंगीकारास पात्र होणार कसें ? कोणतीहि गोष्ट अमलांत आणण्यापूर्वी तिचा हवा तितका खल करण्यास आमची बिलकूल हरकत नाहीं इतकेंच नाहीं, तर तसे झाल्याखेरीज सामान्य लोकांनी कोणत्याहि नवीन गोष्टीचा स्वीकार करूं नये असें आमचें मत आहे. पण जेवढे जुनें तेवढें निर्दोष व चांगलें असा आग्रह धरून बसून जर कोणी नवीन गोष्टीचें चिंतन व चर्चा करणार नाहीं, तर रूढ विचारांतले व आचारांतले प्रमाद दूर होणार कसे, व नवीन विचाराचें व आचारांचे चांगुलपण प्रस्थापित होऊन तें रूढ होणार कसें ? आपल्या देशांतील लोकास नवीन विचारांची जशी भीति वाटते तशी दुसरी कोणत्याहि देशांतील लोकांस वाटत नसेल. उदाहरणार्थ, देव आहे किंवा नाहीं हा प्रश्न आपला आपणांस विचारण्याची कितीकांची छाती होणार आहे ? तसेंच, वेद पौरुष आहेत की अपौरुष आहेत; जातिभेद अस्तित्वांत कशामुळे आले, व ते चटसारे मोडून टाकले असतां काय परिणाम होतील; मुंज, लग्न वगैरे संस्कार, केव्हां कोणी व कशासाठीं स्थापिले, आणि ते मुळींच नाहींसे केले तर काय होईल; पुरुषांप्रमाणे स्त्रियांनीं अविवाहित रहाण्यास, किंवा वाटेल तेव्हां हवें त्याशीं लग्न करण्यास काय हरकत आहे; पुरुषांप्रमाणे स्त्रियांस सारे राजकीय हक्क कां देऊं नये; एका बायकोनें पांचचार नवरे करण्यास,