पान:Aagarakar.pdf/131

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१११

कै. विष्णु कृष्ण चिपळोणकर

वर चालू करावे आणि मग ते साधारण लोकांच्या हातांत देऊन आपण त्यापासून अलग रहावें. आम्हांस तर असें वाटतें कीं शास्त्रीबोवांसारखा हिम्मतवान, प्रशांत, गंभीर आणि निरपेक्ष मनुष्य अत्यंत विरळा असेल. कोणी हितचिंतक मित्र विनोदाने आमच्या गट्टीस ग्राज्वेट पंचायतन, ग्राज्वेट पांडव असें म्हणत. निष्ठुर मृत्यूने आम्हांपैकीं आमचा भ्राता धर्मराज आज यमसदनास पाठविला, व आमच्या बंधाचा ग्रंथमणि हिराविला ही गोष्ट खरी तथापि आमची अशी उमेद आहे की एकवार मनाचा निश्चय करून देशो- न्नतीसाठी झटण्याचा केलेला संकल्प होता होईल तों ढळू देणार नाहीं. प्रथम आम्हांविषयी अशी भीति होती कीं, द्रव्यसंबंधाने आमच्यांत आपआप- सांत कलागती लागून आमची जूट फुटेल. पुढे बर्वेप्रकरण येऊन धडकलें तेव्हां तर कित्येकांना असें वाटलें कीं, या ग्राजुएटांची फटफजीति होते ! आणि आतां तर आम्हांपैकी एकाने परलोकास प्रयाण केलें ! तेव्हां आम्हां- विषय लोकांच्या मनांत नानातऱ्हेचे तरंग येऊ लागले यांत नवल नाहीं. पण सर्वांनी एक गोष्ट लक्षांत धरावी ती ही की, आम्ही जो उद्योग आरं- मिला तो लोकांनी घोड्यावर बसविलेल्या उडत रावाची मनोवृत्ति धारण करून आरंभिला नाहीं. हैं काम आम्ही आपल्या आपखुषीने आणि आपसमजुतीनें आमचे आम्ही आपल्या अंगावर घेतलें; तें तडीला लावण्यासाठीं आमच्याकडून होईल तितका प्रयत्न करण्यास आम्ही कधीही सोडणार नाहीं. देवाच्या किंवा देवाच्या इच्छेपुढें इलाज नाहीं, अशा रीतीनें मनाची खोटी समजूत घालून अशा लोकहिताच्या कामांत प्रति- पक्षाची क्षमा मागण्याचे काम आमच्या हातून होणार नाहीं. अधिकार, धन, वजन यांपुढें टिकाव धरणें दुस्तर आहे हें आम्ही कबूल करितों. परंतु. सत्याचा कैवार घेऊन शुद्ध अंतःकरणानें लोकहितासाठीं भांडणारांना कोण- त्याही प्रकारची धास्ती बाळगण्याचे कारण आहे असें आम्हांस वाटत नाहीं. आणि असे असूनहि प्रसंग येऊन बेतलाच तर तो साहण्यास आम्ही कचरूं अशी कोणीहि शंका घेऊं नये. आमचे धैर्य आणि कार्यनिष्ठा हीं कसास लागण्याची संधि आली आहे असें आम्ही समजतों. शास्त्रीबोवांचीच कथा काय, पण आम्हांपैकीं एक जरी तळावर असला तरी तो आम्ही सर्वानी आरंभिलेले उद्योग आवछिन्न चालविण्यास होईल तितकी खटपट करील,