पान:Aagarakar.pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




गोपाळ गणेश आगरकर

 १९१५-१६ सालची गोष्ट. मी इंटरच्या वर्गात होतों तेव्हां. डॉ. गुणे आम्हांला संस्कृत नाटक शिकवीत असत. उत्तररामचरिताच्या त्यांच्या तासाची मी नेहमीं मोठ्या उत्कंठेनें वाट पाहात राही. कॉलेजांतल्या पहिल्या वर्षी त्यांनी आम्हांला शाकुंतल शिकविलें होतें. त्यांत मी रंगून गेलों नव्हतों असें नाहीं. पण उत्तररामात शाकुंतलांपेक्षां कांहीं तरी निराळीच गोडी आहे असा मला त्यांच्या पहिल्या तासापासून अनुभव येऊं लागला. शब्दसौष्ठव, कलाचातुर्य, कल्पनाविलास, इत्यादि गुणांत कालिदास भवभूतीपेक्षां श्रेष्ठ आहे हें सहज सिद्ध होण्याजोगें होतें. सौंदर्य, माधुर्य, कोमलपणा इत्यादि वैशिष्टयांत भवभूतीला त्याच्याशीं स्पर्धा करणे शक्य नव्हतें हें माझ्यासारख्या विद्यार्थ्याच्याहि चटकन् लक्षांत येत असे. पण उत्तररामाचा तास सुरू झाला, खेळकरपणानें शाकुंतल शिकविणा-या डॉ. गुण्यांच्या मुद्रेवर आणि स्वरांत एक प्रकारचे गांभीर्य प्रचीत होऊ लागलें, ' यथा स्रीणां तथा वाचां साधुत्वे दुर्जनो जनः’, ' ते हि नो दिवसा गताः ?' अशासारखीं मानवतेचीं चिरंतन दु:खें लीलेनें व्यक्त करणारी भवभूतीची वाणी कानांत घुमूं लागली, ज्या क्षणीं रामचंद्र आपल्या डाव्या बाहूची उशी करून तिच्यावर निद्रावश झालेल्या सीतेचे मस्तक मोठया प्रेमानें ठेवतो, त्याच क्षणीं तिच्याविषयीं लोक किती साशंकतेनें बोलत आहेत हें सांगणारा गुप्त हेर दुर्मुख प्रवेश करतो हें पाहून दैवाच्या विचित्र लीलेच्या चित्रणानें पापण्यांच्या कडा ओल्या होऊंं लागल्या, म्हणजे माझ्या मनांत येई-कालिदासांत नाहीं असें कांही तरी भवभूतींत आहे. कालिदास मेघांच्या श्यामल पंखांवर बसवून रसिक मनाला आकाश आणि पृथ्वी यांची विलक्षण शोभा दाखवीत असेल, मानवी वनलता आणि उद्यानलता यांचे सात्त्विक आणि उन्मादक सौंदर्य