पान:Aagarakar.pdf/126

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कै. विष्णु कृष्ण चिपळोणकर

१२

देह त्यागितां कीर्ति मागें उरावी । मना सज्जना हेचि क्रीया धरावी ॥

- श्री रामदास.

 गेल्या शुक्रवारी सकाळीं सात आठ वाजण्याच्या सुमारास होळकर ओळींत एकच गर्दी झाली. शाळांतील लहान मोठीं मुलें व त्याप्रमाणेंच गांवांतील तरुण आणि वृद्ध लोक यांची तोंडें म्लान होऊन त्यांवर विप- रीत कळा आली. इतक्यांत चिपळोणकरांच्या वाड्यांतून स्त्रियांचा दीर्घ रुदनस्वर बाहेर आला ! त्याबरोबर घात झाला अशी खात्री होऊन सर्वजण तोंडाला पदर लावून रडूं लागले. या वेळीं शाळेतील मुलांनीं रडून जो कल्होळ केला तो सांगतां पुरवत नाहीं. विष्णुशास्त्री एखाद्या रोगानें चार सहा महिने खितपत पडले होते असें नाहीं. पंधरा दिवसांपूर्वी क्यांपमध्ये फोटोग्राफ घेण्यासाठी टेबलावर उभे राहिले असतां एकाएकीं पित्तप्रकोप होऊन जी चक्कर आली त्यासरशी ते धाडकन् जमिनीवर बेशुद्ध पडले. कांहीं वेळाने शुद्धीवर आल्यावर त्यांस घरीं आणिलें, नंतर थोडासा ज्वर भरला. पण तो अशा थराला जाईल असें कोणाच्या स्वप्नांत देखील आलें नाहीं. त्या ज्वरामुळें त्यांस क्षीणता आली होती हें खरें पण तो अशा तीव्र वेगाने उलटून बोलतां बोलतां पुण्यांतील मोहरा रातोरात घेऊन जाईल असें कोणासही वाटलें नाहीं. परंतु देवाची परम विचित्र गति ! शास्त्रीबोवांस कलंगड खाऊन थंड पाणी पिण्याची बुद्धि झाली; त्यासरशी कुपथ्य झाल्याचें निमित्त होऊन तात्काळ सन्निपात झाला तो त्यांना घेऊनच गेला. शास्त्री- 'बोवांच्या अकालिक मृत्यूने 'केसरी' चा एक पाय लंगडा झाला यांत कांहींच नाहीं. आज महाराष्ट्रवाणीचा पति परलोकवासी झाल्यानें ती गत- भर्तृका झाली व महाराष्ट्रीयांनीं अद्वितीय रत्न गमाविलें, अशी आमची समजूत आहे. ' मरणं प्रकृतिः शरीरिणाम्' अशी कविकुलगुरूक्ति आहे ती आम्हांस अक्षरशः मान्य आहे. परंतु हा अबाधित सृष्टिनियम शास्त्रीबोवा वयातीत