पान:Aagarakar.pdf/125

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२०५

संतति व संपत्ति

हवें तें इव्य घालण्याला मागें पुढें पाहिलें नाहीं ! आपल्या लोकांत म्हण- ण्याची चाल आहे की द्विपादांत शिडी आणि चतुष्पादांत घडवंची याशिवाय चिनी लोकांच्या आहारास कांहीं एक वर्ज्य नाहीं. या अतिशयोक्तीचा अर्थ इतकाच कीं त्या देशांत लोकसंख्या मनस्वी वाढल्यामुळें त्यांच्या उप- जीविकेला दुसऱ्या लोकांना अभक्ष्य अशा पुष्कळ गोष्टी चालत. सारांश, पृथ्वीवरील नऊ दशांश कोटी लोकांना पोटासाठी साऱ्या जन्मभर सक्तमजुरी करावी लागून अखेरीस देहांत शिक्षा भोगावी लागते ! ही मनुष्यजातीची शोच्य स्थिति पाहून अत्यंत उदासीन व खिन्न झालेल्या एका आधुनिक नाट्याचार्यानें ' विश्व असे हा तुरुंग मोठा प्राणिमात्र कैदी | पदार्थधर्मोचिया शंखला त्या कुणी भेदी || ' असे जे उद्गार काढले आहेत ते किती सत्य आहेत याचा वाचकांनीच विचार करावा. संतति आणि संपत्ति या युगलानें सर्व वसुंधरेस बेजार करून सोडलें आहे. गेल्या दुष्काळांत साठ लक्ष लोक मृत्यूच्या जबड्यांत पडले! येवढ्या मनुष्यहानीनें युरोपांतील एखादा लहानसा देश निर्जन होऊन ठार ओसाड पडला असता ! हिंदुस्थानांत ज्या स्त्रीपुरुषां- कडे मातापितृत्व आलेलें असतें त्यांपैकी तीन चतुर्थीशाला निदान एक द्वितीयांशाला तरी, तो अधिकार प्राप्त होण्यापूर्वी शिशुमुखावलोकनाची इच्छा झालेली असते असें मानण्यास कांहीं हरकत नाहीं; निदान स्त्रियांना तरी एकमेकींकडे पाहून ही संतानचिंता अगदीं अल्पवयांत लागते हें सर्वोस माहीत आहे. तेव्हां प्रस्तुत काली संततीची विशेष वृद्धि झाल्यापासून ज्या पीडा होत आहेत त्यांत आम्ही स्वेच्छेनेंच जाऊन पडतों, किंवा त्या आम्हांस पीडा अशा वाटत नाहींत असें मानिलें पाहिजे. याच प्रश्नाची दुसरी एक बाजू राहिली ती इीं कीं स्त्रीपुरुषाला अपत्यप्राप्तीची कांक्षा नसतां केवळ वयपरत्वें अनुभवलेल्या विषयसुखाचा स्वाभाविक धर्माप्रमाणें परिणाम घडून येऊन कांहीं संतति नको असतां अस्तित्वांत येते. तेव्हां दोनही बाजूंनीं असाच क्रम चालला तर जगाची किती दुःखमय स्थिति होईल व ती टाळण्यास काय उपाय करावे याचा विचार करून ते अमलांत आणणे यांतच मनुष्यपण आहे.
७ आ.