पान:Aagarakar.pdf/116

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आगरकर : व्यक्ति आणि विचार
मंद असतें, तें कवीस कल्पनासामर्थ्याने स्वतः सच स्पष्ट करून घेतां येतें. इतकेच नाही तर काव्यद्वारा तें दुसऱ्यासही स्पष्ट करून देतां येतें. कवि हा कामरूपधारी पटाईत बहुरूपी आहे ! तो क्षणांत राजा बनून सिंहासनस्थ पुरुषांच्या अंतःकरणांतील विचार बोलू लागतो. राजवेष घेऊन अर्धघटिका झाली नाहीं तोच, तो वेष टाकून देऊन तो काळा पोषाक करतो, तोंडाला काजळ फासतो, वस्त्राखालीं पाजळलेलीं शस्त्रें लपवून घेतो, मध्यरात्रीच्या निविड काळोखांत जिकडे तिकडे सामसूम झालें असतां दिव्यासाठी कोणाचा तरी जीव घेण्याचा बेत करीत मारेकरी होऊन बाहेर पडतो ! या स्थितीत पांचपन्नास पळें गेलीं न गेलीं तों, तीं टाकून देऊन अभिसारिका बनतो व अभिसारिकेस योग्य असा पेहेराव चढवून मेघांच्या गडगडाटांची, विजांच्या लखलखाटांची किंवा तुफान वाऱ्यांच्या सोसाट्याची पर्वा न करितां, पावसाच्या मुसळधारेंतून एका चेटासह विहारोद्यानांतील नेमलेल्या लतामंडपांत प्रियकराची भेट घेण्यास जातो ! आतां तो पर्वताच्या शिखरावर किंवा समुद्राच्या किनाऱ्यावर असला तर क्षणभराने धनगराच्या परशापाशीं शेकत बसलेला किंवा न्यायासनारूढ होऊन न्याय करीत अस- लैला दृष्टीस पंडेल ! वायूप्रमाणें तो सर्वगामी आहे; मनाप्रमाणे तो चंचल आहे; हवी ती वस्तु उत्पन्न करणारा तो वस्ताद जादूगार आहे; कल्पना- शंकूच्या जिवावर कालोदर्धीत पाहिजे त्या दिशेस सुकाणूं लावण्यास न डग- णारा तो जरठ झालेला तांडेल आहे; विश्वबीजांप्रमाणे त्याचे उद्गार अनंत व नित्य आहेत. कोणती वस्तू कितीहि दूर असो, किंवा कितीही सूक्ष्म असो, यानें तिच्यावर आपली दुर्बिण किंवा सूक्ष्मदर्शक यंत्र लाविलें कीं, त्याला ती सन्निध आणि स्थूल होऊन हवी तशी पहातां येते, व दुसऱ्यांना तिचें यथातथ्य आकलन होईल अशा तऱ्हेचे तिचें चित्र काढतां येतें. जर तुम्हांला पाताळांतील किंवा स्वर्गातील वस्तुस्थिति पहावयाची इच्छा असेल तर मिल्टनचा किंवा कालिदासाचा हात घट्ट धरून ते नेतील तिकडे जाण्यास तयार व्हा ! अनंत प्रकृतींच्या हृदयडोहांत बुड्या मारून त्यांच्या तळाशीं काय आहे, हें जर तुम्हांला पहावयाचे असेल तर मोलिअर, शेक्सपिअर, गेटी, किंवा भवभूति अशा जगत्प्रसिद्ध पाणबुड्यांच्या कमरेला मिठी मारा ! सारांश, अंतर्बाह्य सृष्टींत अनुकूल किंवा प्रतिकूल संवेदना उत्पन्न करणारी
-