पान:Aagarakar.pdf/114

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आगरकर : व्यक्ति आणि विचार
प्रयोगदर्शनांत मुळींच भेद नाहीं कीं काय, असा प्रश्न सहज उत्पन्न होतो. त्यास इतकेंच उत्तर आहे कीं, भेद आहे; मुळींच नाहीं असें नाहीं; पण तो फार थोडा आहे. काव्यवाचनांत किंवा त्यांचा प्रयोग पहाण्यांत एकमेकांपासून अगदीं भिन्न असे दोन मानसिक व्यापार चाललेले असतात. एक कल्पनाशक्ति प्रज्वलित होऊन ती मनाचें काव्य- वस्तू तादात्म्य करण्यासाठी झटत असते; दुसरा, इंद्रियांपुढें प्रत्यक्ष असणाऱ्या, किंवा कल्पनेनें निर्माण केलेल्या काव्यवस्तु आपापल्या स्वभावा- प्रमाणें वाचकांच्या व प्रेक्षकांच्या अनुकूल व प्रतिकूल संवेदनांत अंशतः कारण होत असतात. यामुळे दुःखपर्यवसायी काव्य वाचीत असतां, किंवा त्याचा प्रयोग पहात असतां वृत्तीला थोडीशी खिन्नता उत्पन्न होते, आणि सुखपर्यवसायी काव्य वाचीत असतां वृत्तीला थोडासा आनंद होतो. अप्रबुद्ध लोकांना पहिल्या व्यापारापासून होणाऱ्या आनंदाची मुळींच कल्पना नसते. यामुळे दुःखपर्यवसायी नाटक पहाणें त्यांना आवडत नाहीं.
 आतांपर्यंत जे सांगितलें आहे त्यावरून तत्त्वशोधकाप्रमाणें कवीचेंही, एका प्रकारच्या सत्यांचा निर्णय करणें आणि तीं सांगणें, हें काम आहे; हें काम बजावण्यासाठी कवीस आपली कल्पना प्रज्वलित करून काव्यवस्तूंश आपल्या मनाचें तादात्म्य करून घ्यावें लागतें; काव्यवस्तु कोणत्याही प्रकारची असो; या तादात्म्यापासून होणारा आनंद सारखाच असतो; "कवींच्या यथार्थ वर्णनांनीं काव्यवस्तूशी वाचकांच्या आणि प्रेक्षकांच्या मनांचें तादात्म्य झालें तर त्यांनाही कवीसारखाच आनंद होईल. काव्यवस्तु कोण- त्याही प्रकारची असो, तिच्या चिंतनांत व्यग्र झालेल्या कवीच्या किंवा वाचकांच्या कल्पनेस जें चांचल्य येतें, तें आनंदमय आहे; काव्य वाचीत असतां किंवा त्याचा प्रयोग पहात असतां वृत्तींत कधीं कधीं जी खिन्नता उत्पन्न होते ती, वृत्ति एकीकडे एकतानतानंदांत गढली असतां इंद्रियांपुढें प्रत्यक्ष असणाऱ्या, किंवा कल्पनेनें निर्माण केलेल्या, भयंकर काव्यवस्तु दुसरीकडून तींत प्रतिकूल संवेदना उत्पन्न करीत असतात, म्हणून होते; सारांश, काव्य दुःखपर्यवसायी असो किंवा सुखपर्यवसायी असो, तें रचण्यांत कवीला आणि तें वाचण्यांत वाचकाला आनंदच आहे; या आनंदांत, काव्य- वस्तूचें बाह्य स्वरूप रमणीय असल्यास थोडीशी भर पडते, व तें भयंकर