पान:Aagarakar.pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आगरकर : व्यक्ति आणि विचार ९२
धरणार नाहीं. उतार वयांत शेंकडों नवानवसांनी झालेलें अपत्य मरण पावलें असतां मातापितरांस जें दुःख होतें, तेंच दुःख जर त्याच्या वर्णनापासून किंवा अभिनयापासून होऊं लागलें, तर ते वर्णन कोण हातांत घेईल ? किंवा तो अभिनय पहाण्यास कोण जाईल ? एखाद्या दुर्गम आणि निर्भय अशा उंच ठिकाणी बसून खाली चाललेली लढाई पाहण्यानें मनावर ज्या प्रकारचे विकार होण्याचा संभव आहे, त्या प्रकारचे विकार दुःखपर्यवसायी कथेच्या वाचनापासून होतात. सर्व मनुष्यांच्या मनोवृत्ति एकाच तऱ्हेच्या असल्यामुळें एकास झालेलें दुःख किंवा सुख त्याच्या बाह्य चिन्हांवरून, वर्णनावरून, किंवा अभिनयावरून दुसऱ्यास समजून येतें, हें खरें आहे. पण या समजून येण्यांत आणि प्रत्यक्षानुभवांत फार अंतर आहे. तरवारी- सारख्या शस्त्रानें मर्मापर्यंत चरचर कापीत जाणे, आणि फक्त अंगाला चाटणे यांत जो फरक आहे, तो प्रत्यक्ष सुखदुःखांत आणि त्यांच्या चित्रांत आहे. कवींची सारी करामत हुबेहुब चित्र काढण्यांत आहे; मूळ उत्पन्न करण्यांत नाहीं. ते मूळ उत्पन्न करू लागतील तर त्यांच्या दुःखो- त्पादक कृतीकडे कोणी ढुंकूनही पहाणार नाहीं.
 हा सगळा वाचकांच्या किंवा प्रेक्षकांच्या सुखदुःखाविषर्थी विचार झाला. दुः पर्यवसायी काव्य लिहितांना खुद्द कवीच्या मनाची काय स्थिति होते, हा प्रश्न अजून राहिलाच आहे. कोणत्याहि प्रकारचें काव्य रचतांना किंवा त्यांतील विषयांचा विचार करतांना कवीस जे आयास होतात, ते प्रत्यक्ष आयासाहून बरेच क्षीण असतात. सुखदुःखाचा प्रत्यक्ष अनुभव, आणि सुखदुःखावर पुनः पुनः विचार करून तीं आपणांसच होत आहेत, असा भास करून घेण्याचा प्रयत्न यांत पुष्कळ अंतर आहे. धनलोभ्याचें धन एका- एकीं नाहींसें झालें असतां, त्याला ज्या यातना होतात, त्या प्रत्यक्ष यातना कवि आपणांस धनलोभी समजून व आपलें सारें वित्त एकाएकीं नष्ट झालें आहे असें समजून, द्रव्यनाशाने खऱ्या धनलोभ्याला होणाऱ्या दुःखाचें प्रतिबिंब आपल्या मनावर उठवून घेण्यासाठीं त्या दुःखाचें एकसारखें चिंतन करतो, व त्यामुळें कांहीं वेळानें त्याच्या मनाची वृत्ति धनलोभ्याच्या वृत्तीसारखी होऊन धनलोभ्याला होणाऱ्या यातनांची बरीच छाया त्याच्या मनावरही पडूं लागते. अशा प्रकारें उत्पन्न केलेल्या दुःखाच्या छायेस अप्र-