पान:Aagarakar.pdf/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आगरकर : व्यक्ति आणि विचार
 आयर्लंडचा इंग्लंडाशी जो झगडा चालत आहे तो सगळा या तत्त्वासाठीं. इंग्लिश लोक सध्यां आयर्लंडाचें राज्य जितक्या व्यवस्थेनें करीत आहेत, तितक्या व्यवस्थेर्ने कदाचित् त्यांचें त्यांना करतां येणार नाहीं; म्हणून त्यांना स्वातंत्र्य देणें बरोबर नाहीं, हें म्हणणे न्याय्य नाहीं. आपलें काम वेडेवाकडें का होईना, पण जेव्हां तें आपल्या हातून वठर्ते, तेव्हां जें समाधान होतें, त्याच्या शतांश समाधान दुसऱ्यानें तें कितीही सुबक करून दिलें तरी होत नाहीं. आणि असें कां होतें याला कारण आहे. आपले काम आपल्यावर पडले असले म्हणजे तें आज नाहीं साधलें तरी उद्यां साधेल, उद्यां न साधलें तर पर्वा साधेल; कालांतरानें तें आपलें आपणांस उत्कृष्ट करतां येऊन त्याच्यापासून होणाऱ्या साऱ्या सुखाचा उपभोग आपणांस घेतां येईल, अशी ईर्षा निरंतर जागृत असते, व तिच्यामुळे अवर्णनीय समाधान होत असतें. पण जेव्हां दुसरा आपले काम करीत असतो, तेव्हां या समाधा- नाचा अंतःकरणास स्पर्श सुद्धां होत नसतो. जो दुसरा आपल्यासाठी आपले काम करीत असतो, तो आपल्यापेक्षां विशेष चतुर असेल, व फारच कमी स्वार्थसाधु असेल, तर कांहीं काळपर्यंत आपणांस नुसतें बाह्यसुख थोडेंसें अधिक होण्याचा संभव आहे. पण ज्याची त्याच्या शिरावर जबाबदारी अस- ल्यानें त्याच्या बुद्धीस जें चांचल्य येतें, उद्योगनिमग्नत्वामुळे त्याच्या वृत्तीत जी प्रफुल्लता असते, कष्टान्ती जय आल्यास जो अनिर्वचनीय आनंद होतो, तो दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणान्यास कधींही व्हावयाचा नाहीं-
7 ~