पान:Aagarakar.pdf/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पांचजन्याचा हंगाम

 आतां एक महिनाभर सर्व देशभर कर्णमनोहर शंखध्वनि चालणार ! हिंदुधर्माच्या नांवाखाली मोडणारे जे अनेक लज्जास्पद आचार या देशांत रूढ आहेत त्यांत शिमग्याला पहिला नंबर दिला पाहिजे. इतका बीभत्स सण दुसऱ्या कोणत्याहि देशांत पाळला जात असेल असें आम्हांस वाटत नाहीं. माघ शुद्ध पौर्णिमेपासून फाल्गुन वद्य पंचमीपर्यंत हिंदु लोकांस पशु- तुल्य वर्तन करण्याचा पास दिला आहे ! दारू, अफीम, गांजा वगैरे मादक पदार्थ मोठे घातक आहेत; परंतु ते मुळींच विकूं दिले नाहींत तर त्यांपासून होणाऱ्या फायद्यांस अजीबात अंतरावे लागेल, म्हणून त्यांचे मक्ते देण्याचा व त्यांच्या विक्रीकरितां परवाने काढण्याचा प्रघात सर्व ठिकाणीं पडला आहे; व याच प्रघाताचे अनुकरण, शिमग्याचा सण स्थापणारांनी केलें असेल की काय असा संशय उत्पन्न होतो ! सगळे लोक वर्षेच्या वर्षे अचकट बोलल्याशिवाय, किंवा उघडपणे जनावरासारखे वागल्याशिवाय राहिले तर, त्यांना सदाचरणाची मोडशी होईल अशी भीति वाटून प्रति- वर्षी निदान एक महिना त्यांस मनसोक्त वागूं देणें जरूर आहे, अशा हेतूने आमच्या शास्त्रकर्त्यांनी ही हुताशनीची पूजा अस्तित्वांत आणिली की काय कोण जाणे ! अलीकडे मोठमोठ्या शहरांत व अर्वाचीन पद्धतीचें शिक्षण मिळालेल्या लोकांत या व्रताचें माहात्म्य थोडेंसें कमी होत चाललें आहे; तथापि याच वर्गापैकी कित्येक इसमांस धर्मश्रद्धेची जी उकळी फुटल्यासारखी दिसत आहे, तीमुळे या निंद्य धर्माचाराचे हे इसम मोठया निकरानें मंडन करण्यास पुढे सरसावण्याचा संभव आहे ! सुधारकानें किंवा सुधारकांनीं अमुक जुना आचार बेवकूफपणाचा ठरविला ना, तर मग आपणांला त्याचे वकीलपत्र घेतलेच पाहिजे, असा या इसमांचा निश्चय झाल्यासारखा दिसतो. होवो बापडा ! सकाळी, दुपारी, संध्याकाळीं व रात्रीं शेफारलेल्या व उनाड, टारग्या पोरांनीं रस्तोरस्ती अनिर्वाच्य शब्द तोंडांतून काढावे आणि सभ्य स्त्रियांस व पुरुषांस लज्जेनें माना खालीं