पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/95

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

हा असा दिवस उजाडला की त्या दिवशी इंग्रजी साम्राज्य संपले. भारत व पाकिस्तान ही स्वतंत्र राष्ट्र अस्तित्वात आली. संस्थानिकांचे इंग्लंडच्या सम्राटाशी असणारे जुने करार संपले. यावेळी जुनागढने आपण पाकिस्तानात जाणार असे घोषित केले. काश्मीरचाही जैसे थे करार पाकिस्तानशी झाला होता. एकटे हैदराबाद मात्र स्वतंत्र होते. तत्त्वतः त्या दिवशी निजाम स्वतंत्र व सार्वभौम होते. हीच परिस्थिती वाटाघाटीचा घोळ घालून नुसती लांबवीत नेली तर हैदराबादचे स्वातंत्र्य केवळ वहिवाटीने स्थापन झाले असते, हे घडविण्याचा सगळा खटाटोप होता. दि. २६ ऑगस्ट १९४७ ला सरदार पटेल म्हणाले हैदराबादेत जनतेचे सार्वमत घ्यावे. जनतेचा निर्णय आम्ही मान्य करू. निजामांनी ही कल्पना फेटाळून लावली. पण स्वामीजीसारख्यांना क्षणभर साशंकता वाटणेही रास्त होते. रझाकारांच्या अत्याचारांनी लोक भयभीत असताना आणि ९० टक्के प्रशासन मुस्लिम असताना सार्वमताचा जुव्वा निजाम खेळले असते तर? बेजबाबदार, विलासी, अत्याचारी राजांना भक्तिभावाने लाखो मते देणारी जनता ज्या देशात आजही आहे, तिथे भारतीय सैन्याच्या ताब्याविना सार्वमत याला अर्थ नसतो. पुढच्या काळात पोर्तुगिजांनी पडद्याआडच्या हालचालीत गोव्याबाबत सार्वमताचा तोडगा सुचविला होता. पण अल्जेरियाच्या अनुभवाने नेहरू सावध झाले होते. त्यांनी ही सूचना फेटाळून लावली असे म्हणतात. सरदारांनीही आपली सूचना फेटाळली जाणार ही खात्री असल्यामुळेच केलेली असावी.

 ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात भारत सरकार व हैदराबादच्या वाटाघाटी सुरू झाल्या. दीर्घकाळ चाललेल्या या वाटाघाटींचा मसुदा ऑक्टोबरअखेर मान्य झाला. सर्व संस्थानिकांशी झालेल्या करारात भारतात सामील होण्याची तयारी दर्शवून मग करार झाले होते. हैदराबादच्या बाबतीत अपवाद करण्यात आला होता. भारतात सामील होण्याचे मान्य न करता, आपल्या स्वातंत्र्याच्या भूमिकेशी तडजोड न करता केवळ जैसे थे परिस्थिती ठेवावी असा हा करार होता. परिस्थितीतील तणाव कमी करावा व स्थायी योजनेचा मधल्या काळात विचार व्हावा हीही करारात तरतूद होती. म्हणजे मसुद्यावर स्वाक्षरी करण्यातसुद्धा निजामाने टाळाटाळ केली. करारावर दि. २५ ऑक्टोबरला सह्या व्हाव्यात असे ठरले असतानासुद्धा निजामाने दिनांक पुढे ढकलला. या कृत्याचीही संगती लागू शकते. कारण पाकिस्तानने तसा सल्ला दिला होता. निजामाने असे वागणे म्हणजे शुद्ध फसवणूक होती. पण त्याला संगती होती. भारताने

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन / ९४