पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/92

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्या दिवशी नोआखालीत उपवासच केला. सरदार आणि नेहरूंचे मन मोठे प्रसन्न नसणार. आम्ही अतिशय बेभान आणि आनंदित होतो. त्यावेळी मी वयाने लहानच म्हणजे फक्त पंधरा वर्षांचा होतो. मला फाळणीचे दुःख झाल्याचे आठवत नाही. ठिकठिकाणी हैदराबाद संस्थानभर हा दिवस सत्याग्रहाच्या कार्यक्रमाने गजबजलेला होता. ठिकठिकाणी खाजगी बैठकांतून स्वातंत्र्योत्सव साजरा झाला. त्या दिवशी ज्या खाजगी सभेत मी होतो, तेथे कोण बोलले ते आता आठवत नाही. आमचा स्वातंत्र्य लढा दि. ७ ऑगस्टलाच सुरू झालेला होता. म्हणून कुणीही मोठा नेता नव्हता. सारे अनोळखीच होते. पण तो वक्ता जे बोलला त्याचे सूत्र मात्र आठवते.

 तो म्हणाला, “देशाची फाळणी झाली हे फार वाईट झाले. पण फाळणीमुळे हैदराबादचे संरक्षण संपले, मित्रहो! दोन-चार वर्षे चिकाटीने लढा व दम धरा. हैदराबाद संस्थानचा मृत्यू जवळ आलेला आहे."

 हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेते कै. पूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांना मी पुढे विचारले होते की, नेमके फाळणीच्या वेळी तुम्हाला काय वाटले होते? स्वामीजी थंडपणे म्हणाले, त्यावेळी पुष्कळच दुःख झाले होते. पण पिकलेले गळू फुटले म्हणजे थोडे हायसे वाटते, तसेही वाटत होते. फाळणी झाली नसती तर आमच्या गुलामीलाच स्वातंत्र्य समजणे नशिबी आले असते; त्याची मला जास्त चिंता होती.

 आम्ही कुणी पाकिस्तानवादी वा फाळणीवादी नव्हतो. उच्चस्वराने अखंड भारताचाच जयजयकार आम्ही करीत होतो. आमच्यापैकी मुलांना पाकिस्तान ही कल्पना नुसती अव्यवहार्य वाटत नसे तर मूर्खपणाची वाटे. आमच्यापैकी कुणी पाकिस्तानची शक्यता किंवा इष्टता सांगितली असती तर, त्याला आम्ही देशद्रोहीच म्हटले असते त्यात शंका नाही. आमचे मुसलमान वर्गमित्र आणि शिक्षक कट्टर पाकिस्तानवादी होते. पण मोठ्यांच्या मनात कुठेतरी भुंगा कुरतडीत होता. भारत अखंड राहीला तर मग आपले काय? फक्त एक शिक्षक याला अपवाद होते. त्यांचे नाव अब्दुल वाहब. ते खादीधारी होते. सारी मुसलमान मुले त्यांचा द्वेष करीत. आमच्या मनात त्यांच्याविषयी भक्तियुक्त आदर होता. ते म्हणाले, भारत अखंडच राहिला पाहिजे. त्यातच मुसलमानांचे हित आहे. आणि अखंड भारतात हैदराबादने सामील झाले पाहिजे. त्यात हैदराबादचे हित आहे. वाहबसाहेब मोठे विद्वान नव्हते. किंवा राजकारणाचे तत्त्वचिंतक नव्हते. ते त्यावेळच्या राष्ट्रीय मुसलमानांप्रमाणे

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन / ९१