पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/91

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.






वेड्या राजकारणाचे आभार

 १५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला हे स्थूलमानाने खरेच आहे. पण देशाच्या कानाकोपऱ्यात स्वातंत्र्याचा उदय वेगवेगळ्या वेळी झाला. ऐन मध्यभागी म्हणजे पोटात ही स्वातंत्र्य तिथी निराळी आहे. जुनागढच्या जनतेसाठी ही तिथी दि. ९ नोव्हेंबर आहे. गोव्यासाठी १९६१ सालातील तिथीचा विचार करावा लागेल. आम्ही जुन्या हैदराबाद संस्थानचे रहिवासी, आमच्यासाठी स्वातंत्र्याचा जन्म दि. १७ सप्टेंबर १९४८ ला होतो. या सुट्या, अलक्षित विभागाची इच्छा एकच होती ती म्हणजे भारतमातेशी एकरूप होऊन जाणे, म्हणून जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा आम्ही गुलामीत होतो. पण स्वातंत्र्याच्या उत्सवात मनाने सहभागी होतो. आणि जेव्हा आम्ही गुलामीतून मोकळे झालो तेव्हा तर आनंदाला उधाण आले होते. पण त्या दिवसाची स्मृती जतन करण्याची इच्छा नव्हती. सर्वांच्या बरोबर आमचाही स्वातंत्र्य दिवस दि. १५ ऑगस्टच राहिला. हैदराबाद शहरातील केशव-मेमोरियल हायस्कूल सोडले तर १७ सप्टेंबरची आठवण आता कुणी काढीत नाही.

 आज इतक्या दिवसांनी जेव्हा मी जुन्या स्मृती चाळवून पाहतो तेव्हा काहीसे चमत्कारिक वाटू लागते. त्यावेळच्या ब्रिटिश भारताला स्वातंत्र्यदिन अतिशय दुःखाचा आणि वेदनेचा होता. जड, भारावलेल्या मनाने, मनातले अतीव दुःख दडपून ठेवीत, ओढलेल्या चेहऱ्याने प्रत्येकजण कर्तव्य म्हणून आनंद व्यक्त करीत होता. त्या दिवशी जनतेचे मन उल्हासाने भरलेले नव्हते. देशभर दंगली चालू होत्या. आपली भयाण व्यथा घेऊन लक्षावधी निर्वासितांचे तांडे येत होते. देशाचे तुकडे पडले होते. गांधीजींनी

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन / ९०