पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/87

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शामराव बोधनकरांच्या घरी गांजवे आले. त्यांनी सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा केली व विचारले, काय करावे? कार्यकर्ते म्हणाले, आपण प्रतिकार करीत मरू पण आता माघार नाही. चर्चा चालू असताना इत्तेहादुल मुसलमीनचे जिल्हाध्यक्ष, रझाकारप्रमुख, आमदार अखलाक हुसेन धैर्याने एकटेच बोधनकरांच्या घरी आले. ते गांजवे यांना म्हणाले, मी तुमच्या भेटीसाठी रझाकारांचा नेता म्हणून आलेलो नाही, मित्र म्हणून आलेलो आहे. आमचे लोक गुंड आहेत. ते जाळपोळीसाठी संधी पाहात आहेत. मला शांतता हवी आहे. मला साह्य करा. आपण ह्यातून मार्ग काढू. अखलाक हुसेन म्हणाले राष्ट्रध्वज तुमचा एकट्याचा नाही, आमचाही आहे. त्यातील हिरवा रंग आमच्यासाठीच आहे. गांजवे म्हणाले, आपल्या मनात राष्ट्रध्वजाविषयी आदर आहे ह्याचे मला समाधान आहे. ह्या किल्ल्या घ्या, आपण ध्वज काढा. माझी हरकत नाही. अखलाक हुसेन म्हणाले, मी ध्वज काढणार नाही. तुम्ही मला रस्ता सांगा. तुम्ही एक तास ध्वज काढता काय? तासाच्या आत मी माणसे पुढे घेऊन जातो. गांजवे म्हणाले, आम्ही ध्वज एक मिनिटही काढणार नाही.

 चर्चा करताना अखलाक हुसेन म्हणाले, तुम्ही ध्वज एक फूट खाली घेऊ शकता काय? गांजवे म्हणाले, फूटभर ध्वज खाली आणून काय होणार? ध्वज तिथेच राहील. मिरवणुकीला ध्वजाखालूनच जावे लागेल. शिवाय ध्वज असा फूटभर खाली घेणे म्हणजे शोक व्यक्त करणे. या उद्योगात काय अर्थ? पण अखलाक हुसेन म्हणाले, ध्वज काढणार नाही हा तुमचा आग्रह कायम राहील. मला माझ्या लोकांना सांगण्यासाठी काही तरी शिल्लक राहील. आपण दोघे ध्वजाशेजारी उभे राहू. माझ्या लोकांनी शांतपणे जावे असे मी सांगेन. तुमच्या मंडळींना शांत राहण्यासाठी तुम्ही सांगा. गांजवे यांनी आपल्या सहकाऱ्यांशी विचारविनिमय केला व मूळ मुद्दा म्हणजे ध्वज काढणार नाही हा शिल्लक राहून तडजोड होणार असेल तर ती मान्य करावा असे आपले मत दिले. सर्वानुमते ही तडजोड स्वीकारली गेली.

 आक्रमक मनोवृत्तीच्या जात्यंध मंडळींना ही तडजोड कुठवर पचेल याबाबत रांजणीकर, अनंत भालेराव, नागनाथ परांजपे यांना शंका होती. म्हणून तडजोड झाली तरी युद्धाची सिद्धता असू द्या, असा निर्णय त्यांनी घेतला. शामराव बोधनकरांचे राहते घर, काँग्रेस ऑफिस असणारे घर, यावर जिथून हल्ला होण्याचा संभव आहे त्या सर्व जागा रोखण्याची व्यवस्था करण्यात आली. अखलाक हुसेन व गांजवे दोघेच वर असणार म्हणून गांजवे यांच्या नकळत त्यांच्या संरक्षणाची सोय करण्यात आली.

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन / ८६