पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/83

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.






८.
नांदेडचे झेंडा प्रकरण -
रझाकार नेत्याचा तिरंग्याला प्रणाम

 नांदेड जिल्ह्यातील स्टेट काँग्रेसची चळवळ आधीच जास्त वळकट अशी होती. गोविंदराव पानसरे ह्यांच्या बलिदानानंतर तर वातावरण तापलेले असेच होते. जीवनमरणाचा निर्णायक लढा जवळ येत आहे आणि हा लढा केवळ निःशस्त्र राहणार नाही ह्याची तीव्र जाणीव नांदेडच्या कार्यकर्त्यांना फार आधीपासून होती. जणू उपजतच होती असे म्हणायला हरकत नाही. लढ्याला आरंभ झाला तेव्हा नांदेडचा गट अगदीच निःशस्त्र नव्हता. पण शस्त्रांच्यापेक्षा हिंमत हाच खरा आधार सर्वांना होता. ज्येष्ठ पिढीत शामराव बोधनकर. भगवानराव गांजवे, गोपाळशास्त्री देव आणि तरुण मंडळीत अनंत भालेराव, नागनाथ परांजपे, रघुनाथ रांजणीकर, जीवनराव बोधनकर असा कडव्या कार्यकर्त्यांचा व अमर्याद मनोधैर्याचा गट नांदेडला होता. ह्या सर्वांच्या जिद्दीतूनच नांदेडचे प्रसिद्ध झेंडा प्रकरण निर्माण झाले.

 ७ ऑगस्ट १९४७ ला स्टेट काँग्रेसचा लढा सुरू झाला; 'भारतात बिनशर्त सामील व्हा' ही लढ्याची प्रमुख घोषणा होती. ह्यानंतर बरोबर एक आठवड्याने म्हणजे भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यदिनी झेंडा प्रकरणाला आरंभ झाला. सराफ्यातील शामराव बोधनकरांच्या तीन मजली इमारतीत वरच्या मजल्यावर काँग्रेसचे ऑफिस होते. भर सडकेवर असणाऱ्या ह्या ऑफिसवर स्वातंत्र्यदिनी भारताचा राष्ट्रध्वज लावावा आणि तो प्रयत्नपूर्वक जतन करावा असा निर्णय सर्वांनुमते घेण्यात आला. हा निर्णय घेणे सोपे मुळीच नव्हते. राष्ट्रध्वज लावताच वातावरण तप्त होणार याची

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन / ८२