पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/81

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

घोषित केले की सर्वत्र हैदराबादच्या फौजा निकराने लढत असून कुठे भारतीय फौज मैल दोन मैल आत आहेत, कुठे हैदराबादच्या फौजा मैल दोन मैल भारतीय हद्दीत आहेत. ही बातमी खरी असावी अशी अमीनची मनोमन इच्छा असली तरी खात्री नव्हती. त्याने दुपारच्या गाडीची बातमी आणण्यासाठी एक माणूस अंबा स्टेशनवर पाठविला होता. तो संध्याकाळी परत आला, त्याने गाडी अजून आली नाही ही वार्ता आणली. गावकऱ्यांना वाटले की गाडी कुठे तरी कार्यकर्त्यांनी उडविली, पाडली असावी. ह्या घटनेचा अर्थ अब्दुल अजीज, फक्त एकच माणूस त्या खेड्यात समजू शकत होता.

 तेरा सप्टेंबरचा सगळा दिवस असा गेला. चौदा सप्टेंबरला संध्याकाळी अमीनने औरंगाबाद स्टेशन लावले. औरंगाबादवरून भारतीय अधिकारी औरंगाबाद भारतीय सेनेच्या ताब्यात असल्याचे सांगत होते. अंबा स्टेशनवर आजही गाडी नव्हती. चौदाला सायंकाळी अमीनसाहेबांना नक्की खात्री पटली की, भारतीय फौजांचा विजय होत असून सर्वत्र हैदराबादची पिछेहाट होत आहे. हैदराबाद रेडिओ मात्र अजूनही सर्वत्र आपला विजय होत आहे, वाशीम, मनमाड, सोलापूरच्या दिशेने फौजा पुढे सरकत आहेत हे ओरडून सांगत होता. पंधरा सप्टेंबरला सर्व गावांतून पीठ गोळा करण्यात आले. गिरणी सतत चालली. ज्वारी व हरभरा दळणे चालूच होते. हिंदू व मुसलमान यांच्या घरीही सतत जाती चालू होती. काही तरी बिघडले आहे हे सर्वांना कळले, पण काय बिघडले आहे ह्याची कल्पना कुणाला येत नव्हती. सतरा सप्टेंबरला हैदराबादच्या जवळ निजामी फौजा शरणागती देत होत्या. कुरुंद्यात सर्व मुसलमान सैपाक करीत होते. त्यांनी रात्री भाकऱ्या व चटण्या बांधल्या व रात्रीच गाव सोडले. ही मंडळी डोंगराकडे गेली. त्यांनी अठराचा सर्व दिवस व रात्र चिंतेत डोंगरावर काढली.

 १८ सप्टेंबरला गावात सर्वत्र सामसूम. गावात एकही मुसलमान स्त्रीपुरुष नव्हता. अमीनसाहेबही नव्हते. आणि साऱ्या गावाला अचानक मरणभय निर्माण झाले. मुसलमान निघून गेले. आता गाव घेरले जाणार, सर्व हिंदूंची कत्तल होणार ही सर्वांची खात्री पटली. पाटलांनी सर्वांना लढण्यास तयार राहण्यास सांगितले. सापडतील ती हत्यारे घेऊन लोक जीव मुठीत धरून मारण्यास, मरण्यास सिद्ध झाले. सारे हैदराबाद तुफान आनंदाने नाचत होते तेव्हा कुरुंदा मरणाच्या भयाने थरथरत होते. १९ ला सकाळी मुसलमान गावात आले. मिळेल त्याला मिठ्या मारून हिंदु-मुस्लिम भाई-भाई

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन / ८०