पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/77

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बाहेरची वर्तमानपत्रे येतच नसत. कारण त्यांच्यावर बंदी होती. उर्दू वर्तमानपत्रे वाचण्याची लोकांची इच्छा नव्हती. गावात एक शाळा चौथीपर्यंत होती. तिथे बहुतेक शिक्षक मुसलमानच होते. गाव रेल्वेपासून दूर होते, मोटार तर नव्हतीच. जवळचे रेल्वे स्टेशन पाच मैलांवर होते. तिथे एक गाडी येई, एक जाई. ह्या गावकऱ्यांना सगळ्या बातम्या कळण्यासाठी माझा मोठा आधार वाटे. आम्ही खरे खोटे अशा बेताने सांगत असू की लोकांचा उत्साह भंग होऊ नये.

 एकाएकी जून १९४८ ला ही व्यवस्था कोसळून पडली. जवळ असणारे वापटी हे गाव आमचे ठाणे होते. ह्या छोट्या गावाने रजाकारांचे अनेक हल्ले परतविले होते. पोलिसांनाही परतण्यास त्यांनी भाग पाडले होते. हे गाव ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात अनेकजण जखमी, काहीजण ठार झाले होते. पण जून महिन्यात असा निर्णय वरिष्ठ नेत्यांनी घेतला की हे गाव रिकामे करून सर्वांनी बायकामुलांसह सरहद्दीबाहेर यावे. असेच एक दुसरे छोटे गाव वाडी होते. तेही रिकामे करण्यात आले. कुरुंद्यापासून फक्त तीन मैलांवर असणाऱ्या ह्या गावावर तीन वेळा हल्ले झाले. रझाकारांपैकी सहा जण ठार, अनेक जण जखमी झाले. पण हे लोकसंख्या ४७ असणारे गाव लढत होते. ही गावे रिकामी करण्याचा निर्णय विशिष्ट कारणामुळे घेण्यात आला होता. हैदराबादच्या सरहद्दीवर क्रमाने भारतीय फौजा जमा होत होत्या. हा वेढा क्रमाने आवळला गेल्यानंतर संस्थानात अत्याचारांना ऊत येणार हे नक्की होते. ह्या छोट्या गावांना ह्यापुढे मदत पोचविणे कठीण होते. त्यांना वाऱ्यावर सोडण्यापेक्षा गावे रिकामी करणे योग्य होते.

 पावसाळ्याच्या तोंडावर शेते, घरे सोडून, जनावरे जंगलात सोडून बायकामुलांसह अनिश्चित काळापर्यंत निर्वासित होणे ही दुःखाची बाब ह्या गावांनी मोठ्या धैर्याने पार पाडली. दिवसेंदिवस सरहद्दीवरील रझाकारांचा धुमाकूळ वाढत होता. सरहद्दीच्या आत दोन तीन मैल शिरून रझाकार लुटालूट करीत. आम्ही कितीही प्रयत्न केला तरी निजामी राजवट उलथून टाकणं आमच्या आटोक्यात नव्हतेच ते काम भारतीय फौजांनाच करणे भाग होते. भारत सरकारने सैनिकी हस्तक्षेप करीपर्यंत जनतेचे मनोधैर्य व लढा टिकविण्याचे काम स्टेट काँग्रेस करीत होता. सरहद्दीवर सेना जमू लागताच आमच्या कार्याचा एक भाग पूर्ण झालेला होता. सरहद्दीवरील निजामी ठाण्यावर हल्ले करणे आणि हल्लेखोर रझाकारांना पिटाळून लावणे हे नवे काम

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन / ७६