पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/76

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ठाण्यावर हल्ला करून ते ठाणे जाळीत. मधून मधून विजेच्या तारा तोडणे, पाटील पांड्यांची दप्तरे जाळणे असेही प्रयत्न होत. जनतेचा छळ करणारे अत्याचारी मुसलमान प्रमुख ह्यांच्या घरावर मधून मधून हल्ले होत. तालुकाभर अशा कार्यकर्त्यांचेही एक वर्तुळ होते. जे कार्यकर्ते असतील असे शासनाला वाटत नसे अशी ही मंडळी तालुकाभर हिंडत, गुप्त सभा घेत, काय घडत आहे याची माहिती देत, पत्रके वाटीत. सशस्त्र कार्यकर्त्यांना हवी असणारी माहिती गोळा करीत. त्यांच्या कार्यक्रमाची निश्चिती करीत. हे काम करणाऱ्या मंडळींत मी एक होतो.

 पंधरा वर्षांचे वय व किरकोळ शरीर असल्यामुळे मी पोरगासोरगाच वाटत होतो. मळके धोतर अगर हाफ पॅन्ट, एक मळके कुडते, डोक्यावरील सर्व केस तासून केलेला गुळगुळीत गोटा व थोडी शेंडी. जवळ एखादे गाठोडे असे. मी तालुकाभर हिंडत होतो. पत्रके तर वाटीत होतोच, पण दारूगोळाही गरजेनुसार इकडून तिकडे पोचवीत होतो. तालुक्यात काही अगदी छोटी गावे असत. दहा-पंधरा घरे. सगळी मिळून लोकसंख्या साठ सत्तर, अशा गावात मुसलमानांचे घरच नसे. ह्या अशा गावांच्यापैकी काही गावे म्हणजे आमचे किल्लेच होते. ह्या गावांवर जवळपास आमचे राज्यच असे. रजाकारांनाही ह्याची जाणीव असे कारण ह्या गावांच्या जवळपास एकटा दुकटा रजाकार गेला तर तो जिवंतही परत येत नसे. पुष्कळदा त्याचे प्रेतही मिळत नसे. ह्या गावांना दारू, गोळ्या पुरवाव्या लागत. माहिती द्यावी-घ्यावी लागे. मी नेहमी राजरस्त्याने चाले. मधून मधून एखादा मुसलमान त्रास देई. अपमान करी. एखाद्या वेळी मुद्दाम कुणी धक्का देई. हे सोडले तर माझे हिंडणे कुणी मनावर घेत नसे. दर पंधरा-वीस दिवसाला होणारी माझी चक्कर हा गावकऱ्यांना दिलासा होता. मी चार-सहा जणांशीच बोले, पण ते गावभर पसरे.

 गावात पोलिस ठाणे होते. ह्या ठाण्यावर एक सबइन्स्पेक्टर व कधी सहा, कधी आठ पोलिस असत. भोवतालच्या लहानमोठ्या तीसचाळीस गावांत त्यांचा दरारा असे. ह्या पोलिसांना खरा आधार गावात असणाऱ्या मुसलमानांचा होता. हजाराच्या मुस्लिम लोकसंख्येत सशस्त्र रझाकारच दोनशेच्या आसपास होते. गावचा पोलिस सबइन्स्पेक्टर हुशार, शूर व कडवा जात्यंध होता. त्याचे नाव अब्दुल अजीज. त्याच्या चाणाक्षपणाचा धाक असे. तो इंग्रजी वृत्तपत्र मागवी. उर्दू वर्तमानपत्र येत. त्यांच्याजवळ एक रेडिओ होता. वर उल्लेखिलेल्या पाटलांच्याजवळ एक रेडिओ होता. गावात

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन / ७५