पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/71

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

समाप्त झाल्यानंतर आपण स्वतंत्र होणार आहो ही घोषणा हैदराबादचे निजाम मीर उस्मान अली खाँ ह्यांनी केलेली होती. त्यांच्या दृष्टीने हे कृत्य नुसते न्याय्य नव्हते तर स्वाभाविकही होते. मोगलांचे सेनापती व सुभेदार म्हणून पहिले निजाम दक्षिणेत आले व त्यांनी स्वतंत्र राज्य निर्माण केले. इंग्रजांचे मांडलिकत्व स्वीकारण्यापूर्वी निजाम स्वतंत्रच होता. इंग्रज गेल्यानंतर जसा भारत स्वतंत्र होईल तसा निजाम स्वतंत्र होईल. जनतेच्या संमतीने मध्य युगात हे राज्य निर्माण झाले नव्हते. तो मुसलमानांचा विजित प्रदेश होता. तेव्हा, आताही स्वतंत्र राहण्यासाठी जनतेच्या संमतीची गरज नव्हती. हैदराबाद संस्थानचा हा पृथक राष्ट्रवाद मोठ्या प्रयत्नाने निजामाने जोपासलेला होता. सुमारे एक कोटी साठ लक्ष लोकसंख्या असणारे हे भारतातील सर्वांत मोठे संस्थान होते. त्याचे स्वतःचे स्वतंत्र पोस्ट होते, तार व्यवस्था होती. स्वतंत्र रेल्वे, स्वतंत्र नाणीव्यवस्था होती. परदेशात जाता-येताना जसे नाक्यावर सामान तपासले जाते तशी व्यवस्था होती. I.C.S. प्रमाणे H.C.S.ही स्वतंत्र नोकरशाही होती. स्वतंत्र छोटीशी फौज होती (१२ हजारांची). सर्व भारतभर मुसलमानांची संघटना मुस्लीम लीग होती. पण हैदराबादसाठी स्वतंत्र इत्तेहादुल मुसलमीन ही संघटना होती. रहीमत अली यांनी १९३४ साली जेव्हा प्रथम पाकिस्तानची भूमिका मांडली त्यात उस्मानीस्थानची स्वतंत्र व्यवस्था होती. तेव्हा स्वतंत्र व सार्वभौम राष्ट्र म्हणून अस्तित्वात येणे ही निजामासाठी स्वाभाविक गोष्ट होती.

 जे संस्थान सर्व बाजूंनी वेढलेले-भारताने-आहे ते स्वतंत्र राहणार कसे, असे फालतू प्रश्न विचारण्यात अर्थ नव्हता. ते मुसलमानांचे राष्ट्र होते. ८७ टक्के प्रजा हिंदू असली आणि मुस्लिम साडेदहा टक्के असली म्हणून काय झाले? हिंदूप्रजा सगळी घाबरलेली व निःशस्त्र होती. सुमारे सोळा लक्ष मुसलमान सर्व जीवनावर प्रभुत्व ठेवून होते. फौजेत आणि पोलिसांत त्यांचे प्रमाण ९५ टक्के होते. कनिष्ठ नोकऱ्यांत ते ७५ टक्के होते. वरिष्ठ नोकऱ्यांत प्रमाण ९८ टक्के असे. राज्यभाषा उर्दू होती. इस्लाम हा राज्याचा अधिकृत धर्म होता. त्यामुळे मोहरमची बारा दिवस सुटी असे, रमजानचा महिना अर्धा दिवस शाळा असे. सुटी रविवारी नसून शुक्रवारी होती. आणि महिने इराणी अजूर-दय-वहमन असे चालत. शिवाय मुसलमानांत अरब व रोहिले सशस्त्र होते. ते सावकारीसह गुंडगिरी करीत. सामान्य मुसलमान सशस्त्रच होता. त्यामुळे एक कोटी चाळीस लक्ष हिंदूंना दाबून ठेवणे निजामाला कठीण वाटत नसे. हैदराबादमधील

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन / ७०