पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/69

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पण परिणाम जर स्वार्थ, लोभ अहंता कमी होण्यात होत नसेल तर ती देवपूजा नव्हे. देवाचे निमित्त करून आरंभ झालेली देहपूजाच आहे. मी स्वामीजींची कृतार्थता पाहिली आहे. त्यांच्यासाठी राजकारण हा अध्यात्माचा प्रांत होता हेच खरे.

 मानवी मनातच परस्परविरोधी अशा दोन प्रेरणा आहेत. स्वतःचा स्वार्थ जपायचा, बलवान करायचा आणि त्या स्वार्थाचे समर्थन करण्यासाठी युक्तिवाद शोधायचे अशी एक प्रेरणा आहे. देवळातील पुजारी जेव्हा रिकाम्या हाताने देवदर्शन घेऊ नये म्हणून सांगतो त्यावेळी देवाचा महिमा ही पुजाऱ्याच्या स्वार्थाची सोयच असते. पण याच मानवी मनात स्वार्थाच्या परिघाबाहेर स्वतःला खेचून नेण्याचीही प्रेरणा आहे. ही जी स्वार्थाचा निरास करणारी प्रेरणा जीवनाला आकार देत असते तिला अध्यात्माची प्रेरणा असे म्हणतात. अध्यात्माची सार्वकालिक अमर गाथाच ही आहे. माणूस स्वतःचे प्रश्न सोडविण्यासाठी झटतच असतो. स्वतःचा स्वार्थ आणि समाजाचा स्वार्थ एकमेकांशी सुसंगत करून टाकणे हाही माणसाचा प्रयत्न असतो, पण माणूस स्वार्थाबाहेर जाण्यासाठी तपही करतो. स्वामीजींसारख्या संन्याशाचे राजकारण हा अशा तपाचा भाग असतो. तुमच्या माझ्या मोजपट्ट्या त्याला लावणे योग्य नव्हे. गेल्या उन्हाळ्यात पुण्याला आम्ही अच्युतराव पटवर्धनांची भेट घेतली. सहज गप्पांतून गप्पा निघाल्या आणि आम्ही स्वातंत्र्य म्हणजे काय या विषयावर बोलू लागलो. क्रांतिवीर अच्युतराव पटवर्धन म्हणाले, “बंधनाचा अभाव म्हणजे स्वातंत्र्य. ही व्याख्या भांडवलशाहीच्या समाजात प्रमाण व आधार राहिली. सर्वांना स्वातंत्र्य देण्यात ही व्याख्या निरुपयोगी ठरली. सर्वांना समान संधी, सर्वांना संरक्षणाची समान हमी ही समाजवाद्यांची, स्वातंत्र्याची व्याख्या व्यवहारात सर्वांना समानपणे गुलाम करणारी ठरते. आपण स्वातंत्र्याची निर्दोष कल्पना केली पाहिजे."

 मी म्हटले, “स्वातंत्र्याची निर्दोष व्याख्या करण्यासाठी आपण अध्यात्मात जायचे काय?" सर्वांविषयी असणाऱ्या उत्कट प्रेमाखातर स्वेच्छेने स्वतःच्या स्वार्थाला घातलेला आवर ही कल्पना स्वातंत्र्यात कुठेतरी आली पाहिजे असे अच्युतराव पटवर्धनांचे मत पडले. मी म्हटले, 'तुमची स्वातंत्र्याची कल्पना मान्य केली तर फक्त खरे अध्यात्मवादीच स्वातंत्र्याचे उपासक होऊ शकतील.' मला वाटते स्वर्गीय स्वामी रामानंद तीर्थ या व्याख्येत बसतात.

***

(प्रकाशन : दैनिक पुढारी २८-३-१९७६)

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन / ६८