पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/68

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

लोक धर्माची, देवळाची नावे घेऊन उभे असतात आणि काहीजणांसाठी राजकारण हाही उपासनेचा भाग असतो असे हे चित्र आहे. मी स्वतः या प्रश्नावर अनेकदा स्वामीजींशी बोललो आहे. एका मर्यादेपर्यंत ते चर्चा करीत व मी मर्यादा संपल्यावर मोकळेपणाने हसून सांगत 'हे मला माहीत नाही, पण हे घडले मात्र खरे.' बुद्धिवाद करून एखादा मुद्दा समर्पकपणे पटवून द्यावा यात त्यांना रस नव्हता. ते म्हणत माझ्यापुरता या मुद्द्यावरील विचार संपलेला आहे. श्रद्धापूर्वक मी निर्णय घेतलेला आहे.

 स्वामीजींनी मला एकदा एक गोष्ट सांगितली होती. त्यांच्या मनोवृत्तीवर प्रकाश टाकणारी अशी ती गोष्ट आहे. एका तुरुंगात एक कैदी होता. आपण या तुरुंगात कधी व कुठून आलो हे त्या कैद्याला आठवत नव्हते. इथून बाहेर सुटावयाचे म्हणजे कुठे जायचे हे कैद्याला माहीत नव्हते. तो कैदी अशक्तही होता. त्याच्या शेजारी एक हातोडा होता. कैदी मधून मधून उठे व भिंतीवर घाव घालू लागे. पहिले दिवशी अज्ञात आवाजाने विचारले, 'भिंत फुटेपर्यंत तुझी शक्ती टिकेल असे तुला वाटते का?' कैदी म्हणाला, 'ते मला माहीत नाही. ठोकीत राहा हा माझा मंत्र आहे.' तिसरे दिवशी अज्ञात आवाजाने विचारले, 'अरे या भिंतीनंतर दुसरी भिंत असेल. तुरुंगाबाहेर पडण्याची ही दिशा बरोबर आहे इतकी तरी तुला खात्री आहे काय?' कैदी म्हणाला, 'तेही मला माहीत नाही. ठोकीत राहा हा माझा मंत्र आहे.' इथे स्वामीजी थांबले. मी विचारले, 'चौथे दिवशी काय झाले?' स्वामीजी म्हणाले, 'तुम्ही नास्तिक आहात. चौथे दिवशी काय झाले हा गौण मुद्दा आहे. गोष्टीचा शेवट तुम्ही कसाही करा. मला दोन शेवट दिसतात. पहिला शेवट असा, चौथे दिवशी भिंत पडली व कैदी स्वतंत्र झाला. दुसरा शेवट असा, कैदी वर्षानुवर्षे ठोकीत राहिला. एक दिवस मरून गेला. भिंत काही पडली नाही. मला दोन्ही शेवट पवित्र वाटतात कारण महत्त्व ठोकीत राहायला आहे. कर्म महत्त्वाचे, निष्कामता महत्त्वाची, फळ गौण.

 राजकारणात अध्यात्मप्रवासी म्हणून कोण येतात हे ओळखणे कठीण नसते. तसे ते सोपे असते. जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात तुम्ही असा. तुमच्या प्रयास-प्रयत्नामुळे स्वार्थ कमी होत जात संपतो आहे काय? जगाविषयी निष्काम प्रेमभावना वाढत जात आहे काय? तुमच्या खटपटीमुळे, धडपडीमुळे मन कर्तव्यच्युत न होताही आसक्त व तृप्त होते आहे काय? जर हे घडत असेल तर सेवेचे क्षेत्र कोणतेही असो, माणूस परमार्थमार्गाचा प्रवासी असतो. तुम्ही त्रिकाळ पूजा, जप व भजन करीत असा

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन / ६७